डोंबिवली– १७ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी नऊ वाजता नवी मुंबईतील खारघर परीक्षा केंद्रावर होणाऱ्या तलाठी स्पर्धा परीक्षेचा मेल १६ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीला आला. या विद्यार्थीने सकाळी मेल तपासल्यावर तिला आपली परीक्षा होऊन गेल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला. अशाप्रकारे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरा मेल पोहचल्याने ते परीक्षेपासून वंचित राहिले असल्याचे विद्यार्थ्यांकडून समजते.
परीक्षा नियंत्रकांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे तलाठी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा घेण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या पुढाकाराने टीसीएस कंपनीच्या नियंत्रणाखाली तलाठी पदासाठी स्पर्धा घेतली जात आहे.
हेही वाचा >>> चव्हाण-शिंदेंच्या मनोमिलनामुळे डोंबिवलीतील विकासकामांना चालना
चार टप्प्यात घेण्यात येत असलेल्या या परीक्षेसाठी १० लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
या परीक्षेसाठी डोंबिवलीतील साक्षी मगर या विद्यार्थीनीने अर्ज केला होता. परीक्षा केंद्रातील प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना १० दिवस मेलव्दारे पाठविले जाईल, असे परीक्षा नियंत्रकांकडून कळविण्यात आले होते. ऑगस्ट मध्ये परीक्षा असल्याने साक्षी दिवस-रात्र परीक्षा प्रवेश पत्र आले का पाहण्यासाठी मेल तपासत होती. १६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता स्वताचा मेल तपासला तरी तलाठी परीक्षेचे परीक्षा प्रवेश पत्र आले नव्हते. उत्सुकतेपोटी १७ ऑगस्ट रोजी सकाळी साक्षीने मेल तपासला. तेव्हा तिला धक्का बसला.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता साक्षीची नवी मुंबईतील खारघर परीक्षा केंद्रावर परीक्षा होती. या केंद्रावर तिला साडे सात वाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. साक्षीने सकाळी मेल तपासला तेव्हा परीक्षा सुरू झाली होती. या सगळ्या प्रकाराने साक्षीसह तिचे पालक नाराज झाले. परीक्षा नियंत्रकांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशाप्रकारे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या गृहसेविकेला अटक ; महागडे कपडे, दागिने घालण्याची आवड
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मी करत आहे. तलाठी परीक्षेचा अर्ज भरल्यापासून या परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. तयारीने ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. यश मिळेल असा पूर्ण विश्वास होता. प्रवेश पत्र मेलवर येईल म्हणून मागील अनेक दिवसांपासून दररोज दिवसातून सहा ते सात वेळ मेल तपासत होते. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत मेल तपासला. त्यानंतर परीक्षा नियंत्रकांकडून मला मेल आल्याचे समजले. रात्री उशिरा मेल पाठवून नियंत्रकांनी विद्यार्थ्यांशी खेळ खेळला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून नियंत्रकांनी एक हजार रुपये शुल्क घेतले आहे. त्यामुळे वेळेत प्रवेश पत्र मिळेल ही परीक्षा नियंत्रकांची जबाबदारी होती, असे साक्षी मगर हिने सांगितले. अशाप्रकारने अनेक विद्यार्थ्यांना उशिरा मेल मिळाल्याने त्यांचेही नुकसान झाले असल्याचे समजते. एखादा विद्यार्थी बाहेर गावी असेल त्याला असा अचानक मेल आला तर तो परीक्षा केंद्रावर कसा पोहचेल याचे भान नियंत्रकांनी ठेवावे, अशी मागणी पालकांनी केली.