कल्याण – महाविजय २०२४ या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दरम्यान कल्याण पश्चिमेत दौऱ्यावर असताना शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या वाहनासमोर येऊन अचानक काळे झेंडे दाखवून बावनकुळे यांना परत जाण्याच्या घोषणा दिल्या.
हेही वाचा >>> मोदींचे वादळ इंडीया आघाडीला उध्वस्त करेल – चंद्रशेखर बावनकुळे
भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीत अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते हाताला काळे रूमाल बांधून घुसले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बावनकुळे यांच्या हर घर मोदी प्रचाराचा शुभारंभ होताच हा प्रकार घडला. त्यामुळे उपस्थितांमध्ये काही वेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेले. बावनकुळे यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
हेही वाचा >>> आगामी लोकसभेची निवडणूक ही संविधानाची निवडणूक – योगेन्द्र यादव
अहिल्याबाई चौक ते टिळक चौक दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी बावनकुळे यांनी हातात ध्वनीक्षेपक घेऊन प्रत्येक दुकान, घरांसमोर जाऊन आपण पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करणार, असे प्रश्न नागरिकांना केले. यावेळी कार्यक्रमाच्यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. रविवारी बावनकुळे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे. हा दौरा डोंबिवलीतून सुरू होत आहे.