ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अश्लाघ्य शेरेबाजी केल्याचा आरोप मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते. त्यामुळे आता ठाण्यातही मराठा समाजाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींविरोधात आक्रमक होताना दिसत आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातही  मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार किसन कथोरे हे आले होते. याबाबत माहिती मिळताच मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांच्यासह काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरले. त्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने कथोरे यांच्या वाहनासमोर येऊन त्यांचे वाहन अडविले. पोलीस आणि कथोरे यांच्या अंगरक्षकांनी त्या कार्यकर्त्याला बाजूला केले. यानंतर कथोरे तेथून निघून गेले. दरम्यान,  किसन कथोरे यांनी आमच्यावर अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी केल्याचा आरोप रमेश आंब्रे यांनी केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी  मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते ठाण्यातही लोकप्रतिनिधींविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत.

Story img Loader