मराठा मोर्चात चंद्रकोरी टिळा, नऊवारी साडय़ा, कोल्हापुरी चपलांचा साज

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला आता काहीसे ‘इव्हेंट’चेही स्वरूप येऊ लागले आहे. एकीकडे एकत्रित येऊन हा समाज आपले शक्तिप्रदर्शन घडवून आणत असतानाच मोर्चाच्या निमित्ताने मराठमोळय़ा फॅशनचेही दर्शन यातून घडत आहे. कपाळावर चंद्रकोरी टिळा लावून सहभागी झालेली तरुण मुले, नऊवारी साडय़ा लेवून सामील झालेल्या महिला, कोल्हापुरी चपला परिधान करून चालणारी मंडळी आणि केसांना ‘चित्रकृती’ कट देऊन आलेली मुले अशा मोर्चेकऱ्यांनी रविवारी ठाण्यातून निघालेल्या मराठा मोर्चाला एखाद्या सांस्कृतिक मिरवणुकीचेही स्वरूप आणले.

एक मराठा, लाख मराठा अक्षर गोंदलेले टी-शर्ट, डेनिम जीन्स, त्यावर भगवा फेटा, कपाळावर चंद्रकोरी टिळा, पायात कोल्हापुरी तसेच नऊवारी साडय़ा, नाकात नथ अशी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले हजारो तरुण, तरुणी मोर्चात पावलोपावली नजरेस पडत होते. मोर्चात सहभागी होताना तरुणांनी छत्रपतींच्या रुबाबाचे प्रतीक मानला जाणारा चंद्रकोरी टिळा, भगवा फेटा, पीळदार मिशा, टॅटू असे आधुनिक समीकरण असलेल्या फॅशनला आपलेसे केल्याचे चित्र दिसत होते. काळा टी-शर्ट, स्ट्रेट फिट जिन्स, भगव्या रंगाची गांधी टोपी आणि भाळी चंद्रकोर लावून ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ म्हणणाऱ्या तरुणींही या मोर्चात अग्रभागी होत्या. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विविध प्रकारचे सनग्लासेस परिधान करताना या तरुणाईला सेल्फीप्रेमही भुरळ घालताना दिसले. काहींनी तर  सनग्लासेस वरही ‘एक मराठा, लाख मराठा’ असे गोंदवल्याचे दिसून आले.

मोर्चा असो वा स्वागत यात्रा पारंपरिक वेशभूषा हा ‘ट्रेंड’ तरुणांमध्ये रुजत चालला असून पारंपरिक वेशभूषेसोबत टिळा, फेटा, टोपी यांसारख्या गोष्टी आता ‘फॅशन’च्या नवा ट्रेडमार्क बनू पाहात आहेत.

त्यामुळेच अलीकडच्या काळात बाजारात फेटे बांधणारे, टिळे कोरून देणारे कारागीर किंवा स्वत:लाच कोरता यावे यासाठी तयार साचे, तयार फेटे यांची चांगलीच चलती दिसू लागली आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेवर आधारित फॅशनचा हा ट्रेण्ड काहीसा जुना होत असला तरी त्यातही दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. काल-परवापर्यंत नऊवारी साडी नेसल्यानंतर त्याला अनुरूप अशी चंद्रकोर कपाळावर रेखाटून घेण्याला महिलावर्गाची पसंती असे. मात्र, आता ही चंद्रकोर जीन्स आणि साडी अशा दोन्ही कपडय़ांवर मिरवताना तरुणी दिसतात. जीन्सवर चंद्रकोर आणि नथ घालण्याची ‘फॅशन’ सध्या नव्याने रुजू लागली आहे.

केशभूषेतही ‘मराठा’

ऑक्टोबर हीटच्या हंगामात केस भादरणे हे काही नवीन नाही. मात्र या मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांनी आपल्या केसांवर मराठा मोर्चाचे प्रतीकात्मक टॅटू काढले होते. यामध्ये बच्चेकंपनीचाही भरणा अधिक होता. काहींनी संपूर्ण केस भादरून त्यावर रंगीत टॅटूही काढले होते. त्यासाठी काही दिवसांची पूर्वतयारी करण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

Story img Loader