पिंपरी : सध्या महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झाला आहे. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसले पाहिजे. ते बसत नसेल तर हट्ट करून चालणार नाही.त्याच्यावर काही पर्याय निघतो का ते शोधले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोशी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> “तो इतका मोठा झालेला नाही, तो बच्चा आहे…”, रोहित पवारांवर अजित पवार म्हणाले…
अजित पवार म्हणाले की, सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. आता मात्र ओबीसी समाजाचे मेळावे चाललेत. मराठा समाजात काही नेते तयार झाले आहेत. धनगर समाजाची काही मागणी आहे. आदिवासी समाजाचे काही म्हणणे आहे. अनेक समाजाचे कितीतरी वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रश्न मांडण्याचे अधिकार सर्वांना आहेत. ती सोडवण्याचीही आमची तयारी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आम्ही मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण दिले. दुर्दैवाने ते न्यायालयामध्ये टिकले नाही. उद्या कोणीही म्हणेल आम्हालाही आजच आरक्षण पाहिजे. पण शेवटी कायद्याच्या चौकटीत ते टिकले पाहिजे. बसत नसेल तर हट्ट करुन चालणार नाही. त्याच्यावर काही पर्याय निघतो का ते शोधले पाहिजे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र ओबीसींनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. टिकणारे आरक्षण द्या ही आमची भूमिका आहे. आरक्षण मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचे, समाजात फूट पाडणे चुकीचा आहे. मी फक्त शाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगत नाही. तर, पहिली कृती करतो. मौलाना आझाद मंडळाला, अल्पसंख्यांकांना जास्त निधी दिला. सरकार बनवत असताना आपण मुस्लिम, ओबीसी, वंजारी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला अशा सर्व घटकांना संधी दिली, असेही पवार म्हणाले.