ठाणे : मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या संकेत कोर्लेकर या अभिनेत्याचा रिक्षामधून प्रवास करताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल खेचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर त्यांनी इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर त्याना आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. हे ठाण्यात घडेल, असा मी अजिबातच विचार केलेला नव्हता. पण, हे घडत आहे. इतका चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे अशी खंत त्याने व्यक्त केली. पोलिसांवर विश्वास असल्याचेही तो म्हणाला. मोबाईल चोरी प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी हा मोबाईल खरेदी केला होता. विशेष म्हणजे, संकेत यांचा मोबाईल चोरीला गेला. त्याच ३०० मीटर भागातून त्याचवेळी आणखी एका तरुणाचा मोबाईल चोरीला गेला. संकेत कोर्लेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे-भिवंडीच्या वेशी जवळील लोढा अप्पर भागात संकेत कोर्लेकर हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. ते मराठी चित्रपट आणि सिनेमांमध्ये काम करतात. त्यांच्या व्यवसायिक कामांसाठी त्यांनी जानेवारी महिन्यात ॲपल कंपनीचा ‘आयफोन १६ प्रो मॅक्स’ हा मोबाईल खरेदी केला होता. ते एका कामासाठी १६ मार्चला सायंकाळी ठाण्यात येणार होते. सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी ठाण्यातील खोपट भागात येण्यासाठी त्यांनी घराजवळून ऑनलाईन रिक्षा बुक केली. ते कॅडबरी जंक्शन जवळ आले असता, त्यांच्या हातामध्ये मोबाईल होता. मोबाईलमध्ये इन्टाग्राम वापरत असताना अचानक एका दुचाकीवर दोन चोरटे आले. त्यापैकी एका चोरट्याने संकेत कोर्लेकर यांच्या हातातील मोबाईल खेचला. त्यानंतर ते चोरटे मुंबईच्या दिशेने निघून गेले.
मोबाईल हातात असल्याने संकेत यांच्या मनगटाला ओरखडे देखील बसले. संकेत यांनी रिक्षामधून त्या चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु ते वेगाने निघून गेले होते. दरम्यान, संकेत हे राबोडी पोलीस ठाण्यात आले. तिथे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्या ठिकाणी त्यांचा मोबाईल चोरीला गेला. त्याचवेळी तिथून ३०० मीटर अंतरावर आणखी एका तरुणाचा मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले. या प्रकरणी संकेत कोर्लेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संकेत कोर्लेकर यांनी या घनटेविषयी त्यांच्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर व्हिटीओ पोस्ट देखील टाकली आहे. यामध्ये त्यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला. इतक्या जोरात माझ्या हातातून मोबाईल हिसकावून ते घेऊन गेले. मी याबद्दल तत्काळ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे आणि माझा पोलिसांवर विश्वास आहे की, ते कारवाई करून मला माझा फोन मिळवून देतील. मी रिक्षात मध्ये बसलो असताना सुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातून हिसकावून घेतला. आज मी आहे. उद्या कोणती महिला असेल. मोबाईल तर सोडाच. कारण ते १०-१० हजारच्या मोबाईलसाठी आसुसलेले लोक आहेत. ही प्रचंड धोकादायक माणसे असल्याचेही ते म्हणाले. तसेच हे ठाण्यात घडेल? असा मी अजिबातच विचार केलेला नव्हता. पण, हे घडल आहे. इतका चोरट्यांचा सुळसुळाट झाला असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. तुम्ही अलर्ट राहा. पोलिसांनी त्या ठिकाणी गस्ती घालाव्यात असेही ते म्हणाले.