प्रशांत दामले, प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर आदींच्या तिखट प्रतिक्रिया

कल्याण : ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर ‘आपण खेडय़ात तर नाही ना’ असा प्रश्न निर्माण होतो. अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य एकीकडे मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असताना मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांनी शहरांतील रस्त्यांच्या परिस्थितीबाबत समाजमाध्यमांवरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा रविवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात प्रयोग होता. त्यासाठी मुंबईहून कल्याणला येताना दामले यांना खड्डेमय रस्त्यांचा अनुभव आला. या अनुभवानंतर दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून खड्डय़ांविषयी संताप व्यक्त केला. ‘कल्याणमधील रसिक उत्तम आहेत. मात्र, रस्ते अगदीच ‘थर्ड क्लास’ आहेत,’ असे ते म्हणाले. या रस्त्यांवरून नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांचे काय हाल होत असतील, याचा विचार करून आपणास ही भावना व्यक्त करावी लागत आहे, असेही ते म्हणाले. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांबाबत दोन आठवडय़ांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती. डोंबिवलीतील रस्ते ६० वर्षांपूर्वीपेक्षा अधिक खराब असल्याची टीका मंगेशकर यांनी केली होती.

सिनेअभिनेता प्रियदर्शन जाधवने त्याच्या फेसबुक खात्यावर ठाण्यातील तीन हात नाका उड्डाणपुलाच्या खड्डय़ांचा फोटो शेअर केला असून ‘मी इमॅजिकाचे तिकीट रद्द करून तीन हात नाका उड्डाणपुलावर सफरीचा आनंद घेत आहे’ असे खोचक विधान प्रियदर्शनने केले. रस्त्यांवरील खड्डय़ांतून वाट काढताना वाहने सावकाश चालवावी लागतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. याचा अनुभव अभिनेता चिन्मय मांडलेकर यानेही घेतला. आपल्याला विलेपार्ले ते ठाणे या प्रवासाला चार तास लागल्याचे चिन्मयने फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले. ठाणेकरांचे रोजचेच मरणे झाले असून रस्त्यावर पडलेले अभूतपूर्व खड्डे, मेट्रो आणि सेवारस्त्यांची एकाच वेळी काढलेली कामे आणि वेळीअवेळी शहरात येणारी अवजड वाहने या सर्वावरच चिन्मयने नाराजी व्यक्त केली.

हे जग खूप मोठ्ठा खड्डा

अभिनेता जितेंद्र जोशी यानेही विविध रस्त्यांवरील खड्डय़ांची छायाचित्रे टाकत याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘हे जग खूप मोठ्ठा खड्डा असून तो भरून काढण्यासाठी जो टॅक्स भरावा लागेल त्यासाठी माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल’ अशी टीका जितेंद्रने या पोस्टमधून केली आहे. त्याच वेळी ‘हा खेळ पुढे असाच चालू राहील’ अशा शब्दांत त्याने हतबलता व्यक्त केली. ‘.. मीसुद्धा टॅक्स भरणाऱ्यांपैकी असल्याने त्यासाठी पैसे कमवायला लगेचच घराबाहेर पडतो आहे..’ असा टोलाही त्याने ‘जाता-जाता’ लगावला.

Story img Loader