कौटुंबिक वादातून १७ वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या करणाऱ्या ४० वर्षीय अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे -पारकर प्रकरणात या अभिनेत्रीच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ञा म्हात्रे आत्महत्येप्रकरणी कळवा पोलिसांनी तिचा पती प्रशांत पारकर याला अटक केली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला असून न्यायालयाने त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कळवा येथील मनीषा नगर परिसरामध्ये राहणाऱ्या प्रज्ञा हिने शुक्रवारी सकाळी मुलगी श्रुतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये प्रज्ञाने श्रुतीचा खून केल्याची कबूली दिली आहे. याच प्रमाणे तिने चिठ्ठीमध्ये या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असेही लिहीले आहे. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांना पतीचा हात असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी प्रशांतला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवला असता प्रशांतच्या अनैतिक संबंधांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती प्रशांतने पोलिसांना दिली. शुक्रवारी सकाळी दोघांमध्ये अशाच प्रकारचा वाद झाल्याने प्रशांत जिमच्या बहाण्याने घराबाहेर निघून गेला. मात्र या सततच्या वादाला कंटाळलेल्या प्रज्ञाने मुलीसह स्वतःचे जीवन संपवले. पोलीस प्रशांतची चौकशी करत असून या चौकशीमधून आणखीन मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

मेसेजवरुन सुरु झाला वाद

शुक्रवारी सकाळी प्रज्ञाला प्रशांतच्या मोबाइलवर एका महिलेचा मेसेज आल्याचे दिसले. तिने तो पाहिल्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.