ठाणे – एकीकडे मराठी पंधवडा दिवस साजरा होत असतानाच, दुसरीकडे शहरात वाचकांची भूक भागवणारे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ग्रंथयान बंद होण्याच्या मार्गावर आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्यासह ग्रंथयानाला पूर्णवेळ चालक उपलब्ध होत नाहिये, त्यामुळे हे ग्रंथयान बंद करण्याचा निर्णय मराठी ग्रंथ संग्रहालयाने घेतला आहे. परंतू, वाचकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने पर्यायी म्हणून घरपोच पुस्तके सेवा उपलब्ध केली जाणार आहे. या घरपोच सेवेत जोपर्यंत पूर्णपणे वाचकांची नोंदणी होत नाही, तोपर्यंत ग्रंथयान बंद करण्याच्या निर्णयाला पूर्णविराम दिला जाणार नाही, असा दावा मराठी ग्रंथ संग्रहालय व्यवस्थापनाने केला आहे.

राज्यात प्रथमच ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाने ११ वर्षांपूर्वी हे ग्रंथयान सुरु केले होते. या अनोख्या फिरत्या ग्रंथालयाच्या संकल्पनेला राज्यात पसंती मिळाली होती. ठाण्यातील कोपरी, तीन हात नाका, शिवाईनगर, कचराळी तलाव, लुईसवाडी, लोकमान्य नगर, पोखरण क्र. २, घोडबंदर रोडवरील मानपाडा, पातलीपाडा, ब्रह्रांड, हिरानंदानी इस्टेट, वसंत विहार, पवार नगर, कॅसल मिल, बाळकूम, खारेगाव, कोलशेत, माजिवडा आदी भागात ग्रंथयानाद्वारे वाचकांना पुस्तके उपलब्ध होत होती. ठाणे शहराचा विस्तार होत असतानाच, शहराच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या मराठी ग्रंथप्रेमी वाचकांसाठी ग्रंथयान सेवा ही पर्वणी लाभली होती. या ग्रंथयानाचे ठाणे शहरात ३५० हून अधिक सदस्य होते.

सद्यस्थितीला ग्रंथयानचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. तसेच ग्रंथयानाला पूर्णवेळ चालक उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा वाचकांची गैरसोय होत आहे. वाचकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीकोनातून ग्रंथयान बंद करुन घरपोच पुस्तके ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठी ग्रंथ संग्रहालयामार्फत देण्यात आली. परंतू, ग्रंथयान बंद करणार या संबंधीची सूचना मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संकेतस्थळावर किंवा ग्राहकांना दूरध्वनीद्वारे कळविण्याऐवजी थेट ग्रंथयानावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाला काही वाचकांकडून विरोध व्यक्त केला जात आहे.

घरपोच सेवा कशी असणार ?

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या व्यवस्थापनाने ग्रंथयानला पर्यायी म्हणून घरपोच पुस्तके योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तक योजनेत मासिक शुल्क २०० रुपये करण्यात आले आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा ॲपच्या माध्यमातून वाचकांना सहा पुस्तके निवडावी लागणार आहेत. त्यापैकी महिन्याला चार पुस्तके वाचकांना घरापर्यंत उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर, नवी पुस्तके पाठविताना जुनी पुस्तके परत घेतली जाणार आहे. प्रत्येक पुस्तकासाठी पाचशे रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर, ग्रंथयान च्या माध्यमातून वाचकांना स्वत: पूस्तक हाताळून तीन ते चार पूस्तक १५ दिवसासाठी उपलब्ध केली जात होती. या घरपोच सेवेमुळे वाचकांना आर्थिक भूर्दंड बसण्यासह पुस्तक हाताळण्यासही मिळणार नाही. यामुळे वाचक संख्या घटण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. घरपोच सेवेसाठी व्यवस्थापनाकडून एका कुरिअर कंपनी सोबत करार केला जाणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. घरपोच पुस्तके सुविधेबाबत जोपर्यंत सर्व वाचकांना कळणार नाही आणि घरपोच सुविधेसाठी त्यांची नोंदणी होणार नाही तोपर्यंत ग्रंथयान बंद केले जाणार नाही. यासाठी आपण ग्रंथयान च्या माध्यमातून सर्व वाचक सदस्यांना यासंदर्भातले परिपत्रक देत आहोत. घरपोच पुस्तक सुविधामुळे वाचकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. – चांगदेव काळे, कार्याध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे

Story img Loader