सीएचएम महाविद्यालयाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्ताने शुक्रवारी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नयन गवळी आणि मोनाली या विद्यार्थ्यांच्या मराठी अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’त कौतुकास पात्र ठरलेली ‘मडवॉक’ एकांकिका या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. या प्रयोगानंतर एकांकिकेमधील कलाकार अभिजीत पवार, श्रीकांत भगत, रोमाडीओ कार्डिगो, पूर्वा कौशिक आणि दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीचे वाचन या वेळी करण्यात येईल. याशिवाय महाविद्यालयातील नवोदित कवींना या वेळी खुल्या व्यासपीठावर आपली कविता सादर करता येईल.

अमराठी प्राध्यापकांचे मराठी कवी संमेलन
ठाणे : जोशी बेडेकर महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्ताने अमराठी प्राध्यापकांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कला महाविद्यालयाच्या गच्चीवर हा कार्यक्रम होणार आहे. अमराठी प्राध्यापकांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण व्हावे, त्यांना ही भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रा. नम्रता श्रीवास्तव, प्रा. झरना टोलानी, प्रा. डॉ. इंद्रायणी रॉय, प्रा. डॉ. जयस्वी सिंग कविता सादर करणार आहेत. याशिवाय अमराठी विद्यार्थीही या वेळी मराठी कविता सादर करतील. याबरोबरच संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मराठीची महती सांगणाऱ्या कवितांचे सादरीकरण प्राध्यापक करणार आहेत. त्यामध्ये प्रा. स्वाती भालेराव आणि प्रशांत धर्माधिकारी मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या संस्कृत, इंग्रजी कवितांचे वाचन करणार आहेत. तर मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख दामोदर मोरे ‘मेरी प्यारी मराठी मय्या’ ही हिंदी कविता सादर करणार आहेत. तर फादर स्टिफन यांच्या मराठी विषयाच्या इंग्रजी कवितेचा हिंदी अनुवाद मोरे सादर करणार आहेत. या वेळी प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग उपस्थित राहणार आहेत.

जागतिक मराठी भाषा दिन विशेष कार्यक्रम
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आदर्श महाविद्यालयाच्या मराठी भाषा व मराठी वाङ्मय मंडळातर्फे  ‘संवाद : तंत्र आणि कौशल्ये’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयात केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन लेखक व कांदबरीकार प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते होणार असून शब्दांचे महत्त्व या विषयावर वृत्तनिवेदिका दीपाली केळकर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र या विषयावर वृत्तनिवेदक श्रीराम केळकर बोलणार आहेत. तर निवेदन एक कला या विषयावर प्रा. अनिल कवठेकर हे बोलणार असून तर गटचर्चेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार व रमाकांत अत्रे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मराठी भाषा व मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप भेले यांनी दिली.

ज्ञानसाधनाच्या ‘मुद्रा’चे प्रकाशन
ठाणे :  मराठी भाषेतुन करिअर करण्यासाठी अनेक संधी सध्याच्या काळात उपलब्ध आहेत. त्यासाठी मराठी भाषेबद्दलच्या प्रेमाबरोबरच भाषेवरील प्रभुत्वाचीसुद्धा गरज असते, असे मत एफएम वाहिनीच्या आकाशवाणी संवादक रश्मी वारंग यांनी व्यक्त केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या ‘मुद्रा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. २१ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रश्मी वारंग, महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत मराठे उपस्थित होते. महाविद्यालयाने मराठी युनिकोड टायपिंग शिबिराचे आयोजन केले होते. यामधून युनिकोड टायपिंग शिकलेल्या उमेश बधाणे, पूजा मोरे, राजश्री चौधरी, अभिजीत साळवी, दीप्ती उतेकर, आशा कुळपे, सोनाली मानकर या विद्यार्थ्यांनी हे हस्तलिखित यशस्वीपणे तयार केले. प्रा. साधना गोरे, प्रा. दीप्ती बोंगुलवार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. अशी माहिती महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख माधुरी पाठरकर यांनी दिली.  
संकलन- किन्नरी जाधव, युवा वार्ताहर

Story img Loader