कल्याण- मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महादुर्ग ॲड्व्हेंचर या गिर्यारोहण संस्थेतर्फे रविवारी मुरबाड जवळील भैरव गडावर चढण्याची मोहिम आयोजित केली होती. या मोहिमेत कल्याण मधील एका आठ वर्षाच्या मुलीने सहभागी होऊन तरुण गिर्यारोहकांबरोबर भैरव गडावर चढण्याची मोहिम यशस्वी केली. या बालिकेचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून एक गिर्यारोहण मोहीम करायचे नियोजन महादुर्ग ॲडव्हेंचर गिर्यारोहण संस्थेचे भूषण पवार यांनी केले. या गटात कल्याण परिसरातील ५० तरुण, तरुणी सहभागी झाले होते. या मोहिमेत कल्याण मधील ग्रिहिता सचिन विचारे या आठ वर्षाच्या मुलीने सहभागी होण्याची तयारी दर्शवली. तिच्या कुटुंबियांनी तिला या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पाठबळ दिले.
हेही वाचा >>> पतीचे ५५ तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत घर सोडून गेलेल्या महिलेचा सहा वर्षांनंतर शोध
भैरवगड तीन हजार फूट उंचीवर सुळका पध्दतीने उभा आहे. भैरव गडाच्या दिशेने जाण्यासाठी मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून घनदाट अरण्यातून जावे लागते. मुख्य रस्त्यापासून पायपीट करत गिर्यारोहक भैरवगडाच्या पायथ्याशी पोहचले. गड चढण्याचे आवश्यक साहित्य सोबत ठेऊन इतर युवकांबरोबर ग्रिहिताने आपल्या क्षमतेप्रमाणे, कडक उन, वारा यावर मात करत दोन तासात भैरवगडाच्या सुळक्यावर पाऊल ठेवले. तिने पाऊल ठेवताच उपस्थित गिर्यारोहकांनी जल्लोष केला. बालवयात गडावर चढण्याचे आव्हान स्वीकारल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रिहिताने यापूर्वी वजीर, शहापूर जवळील माऊली सुळक्यांवर चढण्याची मोहीम यशस्वी केली आहे. माऊंट एव्हेरस्टच्या बेस कॅम्पला जाणारी ती सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून ओळखली जाते.
गिर्यारोहण मोहिमेत महादुर्ग ॲडव्हेंन्चर ग्रुपचे भूषण पवार, सागर डोहळे, अक्षय जमदरे, नितेश पाटील, योगशे शेळके, विकी बुरकुले, कल्पेश बनोटे, ऋतुजा नेरकर, किशोर माळी सहभागी झाले होते.
हेही वाचा >>> वडिलांच्या आजारपणाच्या खर्चासाठी मुलाने केली डोंबिवलीत घरफोडी
‘गिर्यारोहण करताना धाडस आणि भीड या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. नवीन गिर्यारोहक किंवा लहान मुले गिर्यारोहणासाठी सोबत असली की त्यांना आम्ही गडावर चढण्याचे सर्व शारीरिक, तांत्रिक माहिती देतो. त्यांच्या मनातील भीती घालवितो. त्यांच्या मनाची तयारी झाली की ही मुले यशस्वीपणे त्यांच्या क्षमतेने गडावर चढतात,’ असे महादुर्ग ॲडव्हेन्चरचे पवार यांनी सांगितले.