डोंबिवलीतील कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची खंत
साहित्य हा मराठी माणसाचा आवडता विषय असून तो मराठी माणसाचा पिंड आहे. मात्र या हक्काच्या साहित्य क्षेत्रापासूनही मराठी माणूस दूर जात चालला आहे, अशी खंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लबच्या वतीने ‘साहित्याचा उत्सव साहित्य वाटिका’ या कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले नाटय़गृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत साहित्याविषयी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करूनही या कार्यक्रमाला रोटरीच्या सदस्यांव्यतिरिक्त कोणीही नागरिक उपस्थित नव्हते. मोकळे सभागृह पाहून जोशी पुढे म्हणाले, डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी असून येथे शिक्षण घेणारे किती, साहित्य वाचणारे किती आणि भाषणाला जाणारे किती नागरिक आहेत हे पाहण्यासाठी डोंबिवलीत मुद्दाम आलो होतो; परंतु साहित्याविषयी किती कळवळा आहे येथील लोकांच्या उपस्थितीवरून दिसते. हे चित्र बदलण्यासाठी संस्थांनी काम केले पाहिजे. सामाजिक काम करणारे आता साहित्याकडे वळू लागले आहेत ही आनंदाची बाब आहे. वर्तमानपत्रात हल्ली वाढ होत असून वर्तमानपत्र वाचणाऱ्यांनी अशा कार्यक्रमांना आवर्जून यावे. छोटी संस्था हीच मोठी संघटना होत असते शिवसेना पक्ष याचे उदाहरण आहे; परंतु यासाठी मोठे ध्येय बाळगणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
मराठी माणूस हा वेगळा विचार करणारा आहे. जेव्हा आपले आयुष्य तो जगतो तेव्हाच ते कसे असावे हे ठरवावे लागते. २५ पुस्तके लिहूनही माझे समाधान झाले नाही, कारण लिखाण हा असा विषय आहे की एका पुस्तकात तो मांडता येत नाही, असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात भक्कम विचारसरणीच्या माणसांची कमतरता आहे. माणसांनी भक्कम भूमिका घेतली की पक्षही मोठा होतो आणि पक्षातील माणसेही. भाजपाचे त्यावेळचे नेतृत्व आणि आताचे नेतृत्व यात फरक आहे. युती केवळ कागदावर असून चालत नाही तर ती राष्ट्र वा राज्य हिताची हवी. तरुणाई या दोन्ही पक्षाकडे नेहमीच आकर्षित झाली आहे. युतीने एक ध्येय ठेवून एकत्र येत काम केले पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा