ठाणे : महापालिकेत करोना काळात रुजू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान, सेवेत कायम करणे आणि विविध रजा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी काम बंद आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिकेवर मोर्चाही काढला होता. परंतु ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
ठाणे महापालिकेने करोना काळात रुग्ण उपचारासाठी रुग्णालये उभारली होती. याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणुक केली होती. करोना काळानंतरही हे कर्मचारी पालिका सेवेत कायम आहेत. करोना काळात केलेल्या कामाचा विचार करून त्यांना सेवेत कायम ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे सहाशेहून अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून ठोक मानधन देण्यात येते. यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १७५ कर्मचारी काम करीत आहेत. ठाणे महापालिकेने आस्थापनेवरील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहिर केले आहे. परंतु ठोक मानधनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केलेले नाही.
हेही वाचा >>>रेल्वे अधिकाऱ्यांच्या चतुराईमुळे मोबाईल चोर अटकेत; कोपर रेल्वे स्थानकातील प्रकार
सानुग्रह अनुदान देण्याबरोबरच पालिका सेवेत कायम करणे आणि विविध रजा देणे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. तसेच पालिका मुख्यालयावर मोर्चाही काढला होता. यादरम्यान, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका उपायुक्त उमेश बिरारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देत येत नसल्याचे स्पष्ट करत विविध रजेबाबत मात्र सकारात्मक विचार करू असे आश्वासन बिरारी यांनी शिष्ट मंडळाला दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलन काळात पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केल्याने आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.