पाच हजारांहून अधिक मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
उत्तन, वसई, अर्नाळा, मढ या भागांतील मच्छीमारांनी पालघरच्या सागरी हद्दीत केलेल्या अतिक्रमणाला विरोध आणि पर्ससिन मासेमारीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी स्थानिक मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात पाच हजारांहून अधिक मच्छीमार सहभागी झाले होते.
मच्छीमारी समाजाच्या रूढी-परंपरेप्रमाणे आपल्या गावासमोर पश्चिमेस आणि खोल अंतरापर्यंत मासेमारी करण्याबाबत पारंपरिक संकेत असताना वसई, उत्तन भागातील मच्छीमारांनी सागरी हद्दीत येण्यास सुरुवात केली. त्यावेळी या भागातील दातिवरे ते सातपाटी दरम्यानच्या मच्छीमारांनी विरोध केल्याने मोठा संघर्ष झाला होता. वसई-उत्तनचे मच्छीमार प्रगत असल्याने त्यांनी दातिवरे, एडवण, उसरणी, कोरे, केळवा, माहीम, वडराई या गावाचे मच्छीमार यांच्या तुलनेत अप्रगत असल्याने शिल्लक असलेल्या मासेमारी क्षेत्रावर मासेमारी करण्यास आरंभ केला होता. त्या भागातील मच्छीमारी प्रगत झाल्यानंतर मासेमारी क्षेत्र या गावांतील मच्छीमारांना परत करू, असे समाज बांधवांमध्ये ठरले होते. मात्र प्रत्यक्षात वसई, उत्तन, अर्नाळा भागातील मच्छीमारांनी पालघर, डहाणू, उंबरगाव, दमण या सर्व भागांमध्ये कवचे खुंट मारून अतिक्रमण केल्याचे आरोप या भागातील मच्छीमार समाजाकडून केले जात आहेत.
२००४मध्ये तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सागरी नियम अधिनियम नियमन सल्लागार समिती आणि सर्व मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती ठराव घेऊन सातपाटीच्या पश्चिमेस ४२.५ पासून उत्तरेस ३२० डिग्रीपर्यंत सर्व अतिक्रमण संस्थांतर्फे काढून टाकण्याचे निर्णय दिले होते. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने याबाबत पुढील कोणताही निर्णय झाला नव्हता. याबाबत राज्य सरकारने कायदा करून हा प्रश्न मिटवावा असे न्यायालयाने सूचित केले होते. या घटनेला १३ वर्षे उलटून गेली असली तरीदेखील याबाबत सरकारने मासेमारी क्षेत्रासंदर्भात असलेल्या वादामुळे निर्माण झालेला संघर्ष मिटवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याने दमण ते दातिवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.
मच्छीमारांच्या विविध मागण्यांचा पालघर जिल्ह्य़ातील मच्छीमारांनी किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमार वसाहतीमध्ये घराच्या जमिनीचे सातबारे शासन निर्णयाप्रमाणे देण्यात यावे, जिल्ह्यतील मच्छीविक्री करणाऱ्या महिलांना मासे बाजारासाठी जागा उपलब्ध करून देणे, डिझेल खरेदीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून मिळणारा परवाना रक्कम तातडीने उपलब्ध करून देणे, अशा मागण्यांचाही समावेश होता.
वाहतुकीला फटका
मच्छीमारांच्या मोर्चाने पालघर शहरातील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसले. मोठय़ा संख्येच्या मोर्चामुळे पोलिसांना वाहतूक नियंत्रण करणे जड गेले. शिवाजी चौक ते पालघर स्थानक मार्ग पूर्णपणे वाहतुकीने जाम झाला होता. त्याचप्रमाणे पालघर स्थानक रोड ते हुतात्मा स्तंभ येथेही वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. टेंभोडे पालघर रस्ताही पूर्णपणे चक्का जाम झाला होता. हा मोर्चा पालघर रेल्वे स्थानकाहून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन स्थिरावला. मोर्चेकऱ्यांच्या अधिक संख्येमुळे तिथे वाहतूक कोंडी झाली.