‘कयाकिंग’चा प्रसार करण्यासाठी मुंबईचा तरुण पश्चिम किनारपट्टीच्या भ्रमंतीवर

माथ्यावर क्षितिजापर्यंत पसरलेले निरभ्र आकाश, सभोवताली अथांग पसरलेला निळाशार समुद्र आणि सोबतीला एक छोटी कयाक अशा सामग्रीसह शांती आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी एक २८ वर्षीय तरुण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या मुशाफिरीवर निघाला आहे. मजल दरमजल करत हा तरुण आज उत्तनच्या किनाऱ्यावर पोहोचला. तरुणाच्या या अचाट धाडसाचे मच्छीमारांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

मुंबईत जन्मलेला कौस्तुभ खाडे हा दिल्ली आयआयटीमधून संगणकशास्त्र विभागातून पदवी घेतलेला तरुण. वातानुकूलित कार्यालयात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत आयुष्य सुखासमाधानाने घालवता आले असते, परंतु लहानपणापासून असलेले समुद्राचे आकर्षण आणि कयाकिंग या साहसी खेळाची आवड कौस्तुभला स्वस्थ बसू देत नव्हती. कौस्तुभने कयाकिंग या क्रीडाप्रकारात प्रावीण्य मिळवले आहे. ‘एशियन ड्रॅगन बोर्ड’ या स्पध्रेत २०१२मध्ये दोन रौप्य व एक कांस्यपदक आणि २०१३मध्ये एशियन सी कयाकिंग स्पध्रेत पाचवा क्रमांक कौस्तुभने पटकावला आहे. मात्र कयाकिंग या खेळात भारताला म्हणावे तसे जनमानसात अद्याप स्थान मिळाले नसल्याची खंत त्याला वाटत होती. हा खेळ सर्वत्र पोहोचला पाहिजे यासाठी काहीतरी करण्याचे सतत त्याच्या मनात घोळत होते आणि अखेर निर्णय ठरला. मार्च महिन्यात आपल्या नोकरीवर पाणी सोडत कयाकिंग या खेळाच्या प्रसारासाठी भारताची पश्चिम किनारपट्टी पालथी घालण्याचे त्याने नक्की केले. खेळाच्या प्रसारासोबतच शांतता आणि बंधुतेचा संदेशही लोकापर्यंत पोहोचवण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली. गुजरातपासून सुरू होणाऱ्या पश्चिम किनारपट्टीवरच्या द्वारका येथून त्याने १७ नोव्हेंबरला आपली कयाक समुद्रात लोटली आणि सुरू झाला त्याचा सागरी प्रवास. दोन महिन्यांत कन्याकुमारी गाठण्याचे उद्दिष्ट त्याने डोळ्यासमोर ठेवले आहे.समुद्राच्या लाटांशी सामना करत केवळ हातातल्या वल्ह्य़ाच्या साहाय्याने आपली कयाक वल्हवणाऱ्या कौस्तुभला सागरी प्रवासात ठिकठिकाणी नाना प्रकारची माणसे भेटली. कयाकिंग खेळाची माहिती देत एकमेकांशा बंधुत्वाने वागा तसेच शांतता राखा, असा संदेश तो आवर्जून देतो. अथांग समुद्रात एकटय़ाने तेसुद्धा कयाकने प्रवास करणे हे मोठे धाडस आहे. यासाठी कौस्तुभ किनाऱ्यापासून दोन ते दहा किमी अंतरावरून मोबाइलच्या संपर्कात राहील एवढय़ा अंतरावरून प्रवास करतो. गुजरातमधील दीव व भावनगर येथे खवळलेल्या लाटांचा सामना त्याला करावा लागला. याठिकाणी मोठमोठाले खडक असल्याने पाणी कायम अस्थिर तसेच पाण्यात भोवरेदेखील तयार झालेले. अशाच एका भोवऱ्यात त्याची कयाक अडकली, मात्र स्थानिक मच्छीमार नौकेच्या साहाय्याने त्यातून तो सुखरूप बाहेर पडला. ही आठवण मनात कायमची घर करून राहिली आहे, असे कौस्तुभ सांगतो.

उत्तनच्या किनाऱ्यावर जंगी स्वागत

गुरुवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास कौस्तुभ उत्तन सागरीकिनारी पोहोचला. मच्छीमार नेते लिओ कोलासो, स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी आणि मच्छीमार समाज मोठय़ा संख्येने त्याचे स्वागत करण्यासाठी याठिकाणी उपस्थित होता. या सागरी प्रवासात जमा होणारा निधी ‘मॅजिक बस’ या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला देणार असल्याची माहिती कौस्तुभने दिली. उत्तन नंतर मुंबईत पोहोचल्यावर मुंबईत दोन दिवसांचा मुक्काम असून त्यानंतर कौस्तुभ कन्याकुमारीच्या दिशेने कूच करणार आहे.