पूर्वा साडविलकर, मानसी जोशी 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉल बहरले; सवलतींचा ग्राहकांना लाभ; पोषाखांत परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ

गुढीपाडवा तोंडावर आला असताना ठाण्यातील बाजारपेठा आणि मॉलमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी खास पोषाख खरेदी करणाऱ्यांची बाजारात गर्दी होत आहे. पारंपरिक पेहरावाचे सौंदर्य आणि आधुनिक पेहरावातील सहजतेचा मिलाफ असलेले पोषाख खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत. अनेक दुकानांत उत्सवानिमित्त भरघोस सवलती जाहीर करण्यात आल्या असून त्याचा लाभ ग्राहक घेत आहेत.

गावदेवी, जांभळी नाका, स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिवाळसणाच्या तोडीची गर्दी होऊ लागली आहे. शहरातील विविध मॉल्समध्ये पारंपरिक कपडे, उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांवर ४० ते  ५० टक्केविशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. नववर्ष स्वागतयात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी पारंपरिक पेहराव खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. जरी काठाच्या, सिल्क थ्रेड, बनारसी अशा साडय़ांचे वनपीस, अनारकली ड्रेस, पैठणी साडय़ांचे परकर-पोलके, ऑक्सिडाइज्ड दागिने यांना यंदा मोठी मागणी आहे. परंपरेचा ठसा असलेले मात्र वापरण्यास सहज-सोपे असे कपडे खरेदी करण्यास तरुणी प्राधान्य देत आहेत, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. हे कपडे ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पारंपरिक पोषाखावर शोभतील असे पेशवाई हार, लक्ष्मी हार, अँटिक हार आणि टेम्पल हार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. फ्लोरल हाराला अधिक मागणी आहे. या हारांची किंमत ५०० ते १२०० रुपयांपर्यंत आहे.

पुरुषांसाठी धोतर, पितांबर, सदरा, क्रॉस शॉर्ट कुर्ता आणि पायजमा उपलब्ध आहेत. विविध रंगांमध्ये हे कुर्ते उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ८०० ते १२०० रुपयांदरम्यान आहे. त्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे, दुकानदारांचे म्हणणे आहे. ‘ग्राहकांची गर्दी होत आहे. पैठणी, काठपदरी साडी, बनारसी साडीपासून तयार केलेले कपडे खरेदी करण्यास महिला प्राधान्य देत आहेत,’ असे राहुल गोळेकर या विक्रेत्याने सांगितले.

तयार गुढीला मागणी

तयार गुढय़ांना मोठी मागणी आहे. या गुढय़ा ७० ते २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढी उभारण्याएवढा वेळ नसल्यामुळे अनेकांनी तयार गुढय़ांचा पर्याय स्वीकारला आहे. रोज सरासरी १५ ते २० गुढय़ांची विक्री होत असल्याचे बाळू जाधव यांनी सांगितले.

साखरेचा नारळ

गुढी उभारताना साखरेची माळ घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे आठवडाभर आधीच साखरेच्या रंगीबेरंगी माळा दिसू लागल्या आहेत. यंदा माळांबरोबरच साखरेचा नारळ आणि कडाही उपलब्ध आहे. साखरेची एक माळ १० रुपयांना विकली जात आहे, तर साखरेचा नारळ आणि कडय़ाची किंमत प्रत्येकी १५ रुपये आहे.