तिळगूळ २४० रुपये किलो; चॉकलेट, कॉफीसह विविध प्रकारांतील लाडू बाजारात

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या चार दिवसांवर आलेला असून त्यानिमित्त वसई-विरारमधील बाजारपेठा सजल्या आहेत. मकरसंक्रांतीसाठी लागणारी सुगडी, साखरेचा हलवा आणि तिळगुळाचे लाडू बाजारात सर्वत्र दिसत आहेत आणि ते खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

मकरसंक्रांतीसाठी लागणारे ऊस आणि चणे यांच्या किमती वाढल्या आहेत. ऊसाची एक छोटी कांडी प्रत्येकी १० ते १२ रुपये तर चण्याच्या एका जुडीचाही तितकाच भाव आहे. तिळाचे भाव या वर्षी कमी आहेत. सुपर तीळ ७०रुपये , साधे ९० आणि पॉलिश तीळ १०० रुपये किलो रुपयांनी मिळत आहेत. त्यामुळे तिळगुळ २४० रुपये किलोने विकले जात आहेत. चॉकलेट, कॉफी यांसह विविध प्रकारचे लाडू आणि चिक्की विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. काटेरी हलव्यातही रंगीत, तिरंगी हलवा असे प्रकार आहेत. संक्रांतीसाठी लागणाऱ्या सुगडांनी बाजार गजबजून गेला आहे. साखर चणे १० ते १५ रुपये पॅकेटने विकले जात आहेत, तर हळद कुंकवाचे बुके ७५ रुपये डझनाने वसईच्या बाजारात उपलब्ध आहेत, तर लहान मोठे आकर्षक असे पंचपाळे कमीतकमी १० ते ३० रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

काळय़ा रंगाचे आकर्षण

तरुणांसाठी काळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसचे कलेक्शन अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय इमिटेशन ज्वेलरी आणि सौंदर्यप्रसाधने मिळणाऱ्या ठिकाणी काळ्या रंगाच्या नेलपेंट, काळ्या रंगातले स्टड, नोझ पिन, झुमकेही मुली खरेदी करत आहेत, असे विरार येथील विक्रेत्यांनी सांगितले.

तिळगुळ मुंबईतून मागवत असल्याने आम्हाला वाहतूक खर्च होत नाही, शिवाय तिळगुळाच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा १० टक्कय़ाने वाढल्या असल्याने आम्हीही त्यांच्या किमतीमध्ये किरकोळ वाढ केली आहे.

– आकाशभाई, दुकानदार