कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका बाजार परवाना विभागाच्या परवानग्या न घेता उघड्यावर अवैध मांस विक्री करणाऱ्या कल्याण परिसरातील आंबिवली, कोळसेवाडी, आनंदवाडी, मोहने भागातील दहाहून अधिक अवैध मांस विक्रेत्यांवर बाजार परवाना विभागाच्या पथकाने कारवाई केली. या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या जवळील मांस कापण्याची सगळी हत्यारे, ठेले पथकाने जप्त केले.
गेल्या तीन महिन्यांत बाजार परवाना विभागाने ही तिसऱ्यांदा आक्रमक कारवाई केली आहे. यापूर्वी नेतिवली, गोविंदवाडी, बाजारपेठ भागात बाजार परवाना विभागाने कारवाई केली होती. कोळसेवाडी, मोहने, आनंदवाडी परिसरात अवैध उघड्यावर मांस विक्री केली जात असल्याच्या तक्रारी बाजार परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी साहाय्यक आयुक्त ठाकूर यांच्यासह पथकाने पहिले त्या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर अचानक संबंधित भागात कारवाई करून अवैध मांस विक्रेत्यांचे सामान, सुरे जप्त केले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा – कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यात आली. मोठ्या जनावरांचे मांस या दुकानांमधून विकले जात होते. उघड्यावर अशाप्रकारे मांस विक्री होत असल्याने या भागातील पादचारी, रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. अशाच प्रकारची कारवाई बाजार परवाना विभागाने मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, शिळफाटा परिसरातील दुकानांवर करण्याची नागरिकांची मागणी आहे.
हेही वाचा – ठाणे : डोंबिवलीतील कोळेगावातून प्रियकर-प्रेयसीचे अपहरण करून लोखंडी सळईने बेदम मारहाण
अनेक वर्ष सुप्तावस्थेत असलेला बाजार परवाना विभाग साहाय्यक आयुक्त ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यापासून पटलावर आणला आहे. या विभागाचा महसूल वाढविणे, अवैध मांस विक्रीवर कारवाईचा सपाटा लावल्याने अवैध मांस, मासळी, मटण विक्रेते या कारवाईने हैराण आहेत. यापूर्वी या विभागात ठराविक अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती. मंत्रालयासह पालिकेतील वरिष्ठांना पारनाक्यावरील दूध, कृषी बाजार समितीमधील काश्मिरी सफरचंद पुरवणे, वरिष्ठांना दर्जेदार किराणा सामान पुरविणे एवढेच काम या विभागातील तत्कालीन अधिकारी करत होते. अवैध मांस विक्री करणाऱ्यांना हा विभाग यापूर्वी अभय देत होता, अशा तक्रारी आहेत. या विभागातील अधिकारी नंतर लाचखोरीत अडकले.