करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने विशेष बाजारांनाही सुरुवात

पूर्वा साडविलकर

ठाणे : करोनाकाळात शहरांना भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या आठवडी बाजारांना डिसेंबर महिन्यापासून आणखी गती मिळवून देण्याची आखणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. हंगामी उत्पादनांचे आठवडी बाजार अधिकाधिक संख्येने सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहते. हे बाजार शहरी भागालगत सुरू केले जातील, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सुरू केलेल्या आठवडी बाजाराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. करोनाकाळातही नागरिकांना ताज्या भाज्या तसेच फळे उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा कृषी विभागामार्फत बहुतांश ठिकाणी आठवडी बाजार सुरू ठेवण्यात आले होते.

करोनापूर्व काळात जिल्ह्यात एकूण २९७ आठवडी बाजारांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १२५ बाजार विविध भागांत सध्या सुरू आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात ताजा भाजीपाला, कडधान्य, तांदूळ, नागली (नाचणी), वरी, पापड अशा विविध वस्तूंचा हंगाम असतो. थंडी वाढू लागताच पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून तसेच ठाणे जिल्ह्यातील बागायत पट्टय़ातून भाज्या, डाळी, कडधान्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू होते. शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात उर्वरित १७२ आठवडी बाजारही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात  आली.

आठवडी बाजाराला मिळत असलेला प्रतिसाद पाहून यंदा ५० ते १०० नवे आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असून शहरी भागालगत मोठय़ा प्रमाणात आठवडी बाजार सुरू करण्यात येतील. यामध्ये १६० शेतकरी गट पूर्वी जोडले गेले होते तर यंदाच्या त्यात १० ते १५ नवीन गटांचा यामध्ये समावेश होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी माने यांनी दिली.

कुठे असतील बाजार?

ठाणे शहरात उन्नती गार्डन मैदान, पोखरण रोड नं २, ब्रह्मांड, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, डवलेनगर, कोलबाड तर, नवी मुंबई शहरात बेलापूर येथील गणपतशेठ तांडेल मैदान, से. – १५, से. ३ अ राजीव गांधी मैदानाच्या शेजारी आणि एन आर आय कॉम्प्लेक्स तसेच वाशी येथील संभाजीराजे मैदान, से.- ६ टाइप फुटपाथ येथे हे बाजार सुरू होणार आहे.

Story img Loader