दिवा येथे एका तरुणाने एका विवाहित महिलेची एकतर्फी प्रेमातून धारधार शस्त्राने निघृण हत्या केली. ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी ती महिला घरात एकटीच होती. तिचे पती कामावर गेलेले असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी मृणाल घाडीगावकर ही महिला आपल्या पतीसह दिवा येथे राहण्यासाठी आली. तिचे पती हे निर्मल लाइफस्टाइल येथे कर्मचारी होते. त्याच भागात राहून मोबाइल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या अतुल कमलेश सिंह याचे मृणालवर एकतर्फी प्रेम जडले. मृणालने त्याच्याकडे कधी लक्ष दिले नाही.
एकतर्फी प्रेमातून संतापलेल्या अतुल कमलेश सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन असलेल्या मृणालच्या घरी गेला. त्याने आतून कडी लावली. किचनमध्ये काम करीत असलेल्या मृणालवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या हल्ल्याने मृणाल गोंधळली आणि आरडाओरड करीत हॉलमध्ये आली. तिचा आवाज ऐकून आसपासचे रहिवाशी धावून आले. पण दरवाजा आतून बंद असल्याने ते काही करू शकले नाही. त्यांनी हा प्रकार खिडकीतून पाहिला. स्थानिक नागरिकांनी मुंब्रा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी आरोपी अतुल कमलेश सिंहला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी आज आरोपी अतुलला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.