बाराव्या शतकापासून आजच्या काळापर्यंत मारवाड जातीच्या घोडय़ाने आपल्या विशिष्ट गुणवैशिष्टय़ांमुळे अश्वप्रेमींमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. मारवाड येथे बाराव्या शतकात राठोड आणि राजपूत या राज्यकर्त्यांनी मारवाड हा घोडा विकसित केला. आक्रमणात मारवाड घोडय़ांनी लढवय्यांना मदत केली. ब्रिटिशांचे भारतात आगमन झाल्यावर त्यांच्यासोबत त्यांनी युरोपियन घोडय़ाच्या प्रजाती आणल्याने मारवाड घोडय़ाची प्रजात मागे पडली. १९४० च्या दरम्यान महाराजा उमेदसिंग यांनी मारवाडमध्ये या घोडय़ांचा प्रसार सुरू केला. सध्याचे मारवाडचे राज्यकर्ते महाराजा गजसिंग यांनी मारवाड घोडय़ांच्या प्रसारासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले. सोळाव्या शतकात राजपूत अकबराच्या आधिपत्याखाली होते. अकबर बादशहाने त्यावेळी ५० हजार मारवाड जातीचे घोडदल बनवले. मारवाडी योद्धय़ांनाच या घोडय़ांवर स्वार होण्याची परवानगी होती. १९९५ नंतर या ब्रीडला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मारवाड हॉर्स सोसायटी महाराजा गजसिंग यांनी स्थापन केली. २००० ते २००७ या कालावधीत भारतातील मारवाड घोडे परदेशात पाठवले जात होते. मात्र मोठय़ा प्रमाणात मारवाड घोडे परदेशात जाऊ लागल्याने कालांतराने सरकारने या घोडय़ांच्या परदेशी रवानगीवर बंदी आणली. अत्यंत काटक आणि मजबूत असल्यामुळे कठीण परिस्थितीत तग धरून राहण्याचे मारवाड घोडय़ांचे वैशिष्टय़ वाखणण्याजोगे आहे. याच वैशिष्टय़ामुळे वाळवंटी प्रदेशातही मारवाड घोडे कामासाठी मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. पोनी आणि अरेबियन अशा दोन ब्रीडपासून तयार झालेले मारवाड जातीचे घोडे मजबूत शरीरयष्टीसाठी लोकप्रिय आहेत. भारतीय सैन्यदलातील घोडदलात ब्रिटिश आणि मारवाड या दोन मिश्र जातीच्या घोडय़ांची आवश्यकता असते. यासाठी भारतीय सैन्यदलाच्या घोडदलात मारवाड घोडय़ांना मान आहे. जोधपूर, जयपूर, राजस्थान येथे मारवाड घोडय़ांचे मोठय़ा प्रमाणात ब्रीडिंग होते.
काळा घोडा अशुभ
वेगवेगळ्या रंगांमध्ये मारवाड घोडे अस्तित्वात असले तरी शुभ्र पांढरा आणि करडय़ा रंगाच्या घोडय़ांना विशेष मागणी असते. पूर्ण काळ्या रंगाचा मारवाड घोडा अशुभ असल्याचा समज मारवाडमध्ये आहे. काळ्या रंगाच्या घोडय़ाच्या पायावर काही प्रमाणात पांढऱ्या रंगाचे पट्टे असले तरच काळ्या रंगाच्या मारवाड घोडय़ाला मागणी असते; अन्यथा संपूर्ण काळ्या रंगाचा घोडा विकला जात नाही.
शेतीच्या कामासाठी उपयुक्त
मारवाड घोडे कठीण परिस्थितीशी जुळवून घेणारे असल्यामुळे पंजाब, राजस्थानमध्ये शेतीसाठी या घोडय़ांचा उपयोग होतो. वाळवंटी प्रदेशातदेखील अतिउष्ण ठिकाणी मारवाड घोडे उत्तमरीत्या राहू शकतात.
दणकट असल्यामुळे विशेष काळजी नाही
इतर घोडय़ांच्या जातीपेक्षा मारवाड घोडे प्रचंड बळकट असल्यामुळे या घोडय़ांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. केवळ नियमित व्यायाम आणि दर सहा महिन्यांनी लसीकरणाची आवश्यकता या घोडय़ांना असते. तुलनेने इतर घोडय़ांपेक्षा मारवाड जातीच्या घोडय़ांचा आहार कमी असतो. आहारात समतोल राखल्यास या घोडय़ांची योग्यरीत्या शारीरिक वाढ होण्यास मदत होते. हॉर्स शोमध्ये हे घोडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधतात. इतर घोडय़ांप्रमाणेच तबेला स्वच्छ ठेवावा लागतो. तबेला ओलसर न ठेवता पूर्णपणे सुक्या जागेत घोडय़ांना ठेवावे लागते. या घोडय़ांची शारीरिक विशेष ठेवण म्हणजे इतर घोडय़ांचा कानाच्या वरचा भाग आतील बाजूस चिकटत नाही. मारवाड घोडय़ांच्या कानाचे टोक आतील बाजूस चिकटत असल्याने मारवाड घोडे ओळखण्यास सोपे जातात. कल्याण, डोंबिवली, पुणे येथे काही अश्वप्रेमींनी मारवाड घोडे पाळले आहेत.
पेट टॉक : मारवाड घोडा
इतर घोडय़ांच्या जातीपेक्षा मारवाड घोडे प्रचंड बळकट असल्यामुळे या घोडय़ांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
Written by किन्नरी जाधव
Updated:
आणखी वाचा
First published on: 21-06-2016 at 02:32 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marwari horse