वसई-विरारमध्ये ‘करोना’ चिंतेने खपात वाढ; किमतीत अवाच्या सवा वाढ
प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता
विरार : ‘करोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाभोवती कापडी आवरण (मास्क) वापरण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय जंतुनाशक द्रव्यचा (सॅनिटायजर) अवलंब करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत. मात्र, वसई आणि विरारमध्ये या दोन्ही गोष्टींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा काही दुकानदारांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. कापडी आवरण आणि जंतुनाशक द्रव्य अवाच्या सवा किमतीत विकले जात आहे. यावर प्रशासनाने वेळीच अंकुश लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
वसई-विरार मधील सर्वच औषधांच्या दुकानावर सध्या कापडी आवरण आणि जंतुनाशक द्रव्याचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत काही दुकानदारांनी नफेखोरीस सुरुवात केली आहे. यात कापडी आवरण आणि जंतुनाशकांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या जंतुनाशकांची चढय़ा किमतीत विक्री सुरू आहे. शहरातील बहुतेक औषध दुकानांमधील जंतुनाशके आणि कापडी आवरणे संपलेली आहेत.
सध्या बाजारात ‘एन-९५ मास्क’ ची किंमत ३०० ते ५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. याआधी त्याची किंमत २०० रुपयांच्या आसपास होती.
साधे कापडी आवरण १० ते १५ रुपयाला मिळत होते. सध्या त्याची किंमत ३० ते ५० रुपये इतकी झाली आहे.
डेटॉल, लाइफबॉय, हिमालया या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या जंतुनाशकांचा सर्वच औषधांच्या दुकानात तुटवडा आहे. यामुळे काही ठिकाणी काळ्याबाजार करून विक्री होत आहे. कापडी आवरण आणि जंतुनाशकांच्या किमती उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी वाढवल्या आहेत. फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपन्यांमार्फत स्वस्तातली कापडी आवरणे आणि जंतुनाशके तयार केली जात आहेत, तीच आम्हाला सध्या विकावी लागत असल्याचे नॅशनल औषध दुकानदार अमित शेख यांनी सांगितले.
पानपट्टी, किराणा दुकानात जंतुनाशक
कापडी आवरण आणि जंतुनाशक पानपट्टी आणि किराणा दुकानात मिळत आहेत. उपलब्ध असलेली आवरणे आणि जंतुनाशक गुणवत्तापूर्ण आहेत की नाही, याची कोणतीही शहानिशा केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासकीय सूचनेनुसार लोकांनी विशेष ‘मास्क’ वापरणे गरजेचे नाही, उत्तम प्रतीचे जंतुनाशक वापरणे योग्य. परंतु, त्याच्या दर्जाची योग्य तपासणी करावी. ज्यांना सर्दी खोकला आहे, त्यांनी रुमाल वापरल्यास काही हरकत नाही.
-डॉ. संजय मांजलकर, अध्यक्ष नालासोपारा मेडिकल असोसियशन