लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्व, ग्रामीण भागात काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना या विधानभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाला उमेदवारी न देण्यात आल्याने कल्याण जिल्हा काँग्रेस समितीने जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक राजीनाम्याचा निर्णय रविवारी घेतला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनीही पदाचा राजीनामा दिला.

कल्याण, डोंबिववली पट्ट्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामधील एकाही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला (शरद पवार) उमेदवारी न देण्यात आल्याने दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य निर्णय घेतला नाहीतर महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराचे काम करणार नाही, अशी ताठर भूमिका या दोन्ही पक्षातील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या निर्णयामुळे कल्याण पूर्व, ग्रामीण, पश्चिमेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे राहणार आहे.

आणखी वाचा-दयानंद चोरघे यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी; चोरघे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप

कल्याण पूर्वेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या पदाधिकाऱ्यांची झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सांगितले, अनेक वर्ष ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ठाणे जिल्ह्यातून निवडून जात होते. कल्याण पूर्व भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून जात होता. जिल्ह्यातील एक नेता हेतुपुरस्सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडत आहे. प्रदेश नेत्यांनी योग्य निर्णय न घेतल्यास सुधीर पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून कल्याण पूर्वेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे.

कल्याण, डोंबिवली परिसरात काँग्रेसचा हक्काचा मतदार आहे. तरीही प्रदेश काँग्रेस नेत्यांनी कल्याण परिसरातील चारपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा विचार केला नाही. त्यामुळे आपण कल्याण जिल्हा काँग्रेस जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामा देत आहोत. कल्याण पूर्वमध्ये आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत पक्षाने कल्याणमधील उमेदवारीबाबत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा कल्याण डोंबिवली परिसरातील एकही काँग्रेस कार्यकर्ता महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी घेतली आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये चक्कीनाका येथे निवडणूक भरारी पथकाकडून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त

कल्याण शहर परिसरात काँग्रेसचा हक्काचा मतदार आहे. हे माहिती असुनही कल्याण पट्ट्यात काँग्रेसचा एकही उमेदवार देण्यात आला नाही. त्याचा निषेध म्हणून आपण सर्व पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहोत. कार्यकर्ते या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही. -सचिन पोटे, जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा काँग्रेस समिती.

कल्याण पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) बालेकिल्ला आहे. येथून आपण निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. कल्याण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) उमेदवार न दिल्याने आपण ठाणे जिल्हा युवक काँग्रेस पदाचा राजीनामा देत आहोत. -सुधीर पाटील, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार).