एकीकडे शहरीभागात स्वच्छतेचा नारा देत पालिका प्रशासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियाना’ची मोहीम राबविण्यात येत असली तरी मीरा-भाईंदरचाच एक भाग असलेला उत्तनचा समुद्रकिनारा मात्र कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. विविध प्रकारचा कचरा दररोज समुद्रकिनाऱ्यावर येऊन थडकत आहे. किनारा सफाईची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नसल्याने साफसफाई अभावी येथील मच्छीमार समाजाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तनमधल्या पालीपासून ते भाटेबंदरापर्यंत सुमारे पाच किलामीटरचा समुद्रकिनारा उत्तनला लाभला आहे. मासेमारी हा येथील मुख्य व्यवसाय असल्याने साहजिकच येथील मच्छीमार समाजाचे वास्तव्य समुद्रकिनारीच आहे. भौगोलिकदृष्टय़ा या किनाऱ्याचे वैशिष्टय़ असे की समुद्राच्या पाण्यातील अनेक प्रवाह याच किनाऱ्याकडे वळलेले असल्याने समुद्रातला सर्व कचरा उत्तन किनाऱ्यावर येऊन थडकत असतो. अनेक वेळा ठाणे जिल्ह्य़ात तसेच मुंबईतही भर पावसात पूर परिस्थिती निर्माण होत असते. अशा वेळी पुराच्या पाण्यासोबत कचरादेखील समुद्रात वाहून जातो. हा कचरा ठाणे खाडीमार्गे उत्तनच्या किनाऱ्यावर येऊन साचतो. हीच परिस्थिती मुंबईतल्या कचऱ्याचीदेखील आहे. या कचऱ्यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या कचऱ्याचा समावेश असून या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा अडकून तो पिशव्यांसोबत किनाऱ्यावर येत असतो. अनेक वेळा मेलेल्या जनावरांचे मृतदेह तसेच समुद्रात वाहून गेलेल्या व्यक्तींचे मृतदेहदेखील उत्तन किनाऱ्याला लागत असतात.

मच्छीमारांचा किनाऱ्यावर कायमच वावर असतो. पकडून आणलेली मासळी वेगळी करणे, किनाऱ्यावर बांबू लावून त्यावर मासे सुकवणे आदी कामे मासेमारीच्या ऐन हंगामात किनाऱ्यावरच सुरू असतात, शिवाय मासेमारी बंदीच्या काळात समुद्रकिनारा हाच मच्छीमार समाजाचे मैदान असल्याने त्यावर विविध प्रकारचे खेळ, स्पर्धादेखील खेळल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावर वाढत असलेला कचरा या मच्छीमारांचा डोकेदुखी ठरू लागला आहे. किनाऱ्यावर येणारा कचरा साफ करण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. महापालिकेने प्रभाग सफाईसाठी कर्मचारी नेमले आहेत. हे कर्मचारी केवळ रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम करतात. त्यामुळे किनारे कचऱ्याने भरलेले तसेच राहात असल्याने स्थानिक मच्छीमार या कर्मचाऱ्यांनाच विनंती करतात अथवा स्वत:च हाती झाडू घेऊन किनारा साफ करण्याची मोहीम हाती घेतात, अशी माहिती स्थानिक नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी दिली.

दरवेळी हे शक्य होत नसल्याने अनेक वेळा कचरा किनाऱ्यावर तसाच पडून सडत राहतो. यामुळे दरुगधी सुटून किनाऱ्यावर जाणेही अशक्य होऊन बसते. परंतु समुद्रकिनारा हीच कर्मभूमी असलेल्या मच्छीमारांना दरुगधीचा सामना करतच आपली कामे उरकावी लागत असल्याने मच्छीमारांचे तसेच किनाऱ्यावरच घरे असलेल्या स्थानिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. दुसरीकडे उत्तन परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेक पर्यटक उत्तनकडे आकर्षित होत असतात. येथील भाटेबंदर समुद्रकिनारा, वेलंकनी माता मंदिर या ठिकाणी तर पर्यटकांची सतत वर्दळ असते. अशा वेळी कचऱ्याच्या दरुगधीमुळे पर्यटकदेखील या परिसराकडे पाठ फिरवतील, अशी भीती उत्तन धर्मग्राम पालकीय परिषदेचे सदस्य रेनॉल्ड बेचरी यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने किनारा स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी उत्तन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्त नरेश गीते यांची भेट घेऊन केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive amount of garbage on uttan beach