विविध कार्यक्रमांचे आयोजन, निवासस्थान परिसर, शाखांमध्ये सजावट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे शहरात बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान आणि परिसर पुष्पहारांनी सजविण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली होती. एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील आनंदआश्रमात जाऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहारअर्पण करून दर्शन घेतले. तसेच लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. किसननगर येथील त्यांच्या शाखेत जाऊन त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याण: टिटवाळ्यातील ‘केडीएमटी’चे बस स्थानक अडगळीत,मालमत्ता विभागातील लालफितीचा फटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी राजकारणी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांकडून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने या वाढदिवसाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. ठाण्यात सुमारे चार ते पाच दिवसांपासूनच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रमांची लगबग सुरू होती. बुधवारी रात्रीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील शुभ दीप या निवासस्थानी आणि निवासस्थानपरिसरात मोठ्याप्रमाणात पुष्पहारांनी सजावट करण्यात आली होती. त्यामुळे हे पुष्पहार आकर्षणाचा विषय ठरत होते. मुख्यमंत्री यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्री १२ वाजता पासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. शिंदे हे बुधवारी रात्री बारा वाजता निवासस्थानी दाखल झाले. याचदरम्यान बंगल्याबाहेरच कार्यकर्त्यांना भेट त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्यात येऊन शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा >>> बदलापूर : मुरबाडजवळ बिबट्याचा मृतदेह आढळला; नैसर्गिक मृत्यूची नोंद, कोरावळे गावाच्या हद्दीत सापडला मृत बिबट्या

ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनामार्फत आरोग्य तपासणी, रक्तदान, लसीकरण आणि मोतीबिंदू तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातील कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी धान्य वाटप, क्रिकेटचे साहित्य, नऊ रुपयांमध्ये नऊ खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवली होती. पाणीपुरीचे मोफत वाटप केले. तर तलावपाळी येथील शिवाजी महाराज मैदानात कबड्डी सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा येथील आहेत. त्यामुळे सातारा येथून आलेल्या काही जणांनी सव्वा किलोचा कंदी पेढ्यांचा हार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी घेऊन आले होते. नांदेड जिल्ह्यातून शिंदे यांच्यासाठी काही कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार भेट म्हणून आणला होता. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून हा २१ किलोचा हार बनवण्यात आला होता.

लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा

ठाण्यातील किसननगर येथून एकनाथ शिंदे यांनी राजकीय कार्याची सुरूवात केली होती. त्यामुळे दरवर्षी ते वाढदिवसानिमित्ताने किसननगर येथे जात असतात. गुरुवारी सकाळी त्यांनी किसननगर येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिंदे यांनी येथील शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी किसननगर येथील शाखेलाही भेट दिली. तसेच तेथील काही कार्यक्रमाचेही उद्घाटन केले. त्यांनी परिसरात लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. याचदरम्यान त्यांनी शालेय साहित्याचे वाटप केले.

शिंदे आनंद आश्रमात

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभीनाका येथील आनंद आश्रमालाही सजविण्यात आले होते. दुपारी शिंदे हे आनंद आश्रमात गेले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. टेंभीनाका येथे येण्यापूर्वी ते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळीही गेले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive crowd of supporters gathers in thane to meet cm eknath shinde zws
Show comments