अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर बंद पडलेल्या मोरिवली भागातील कचराभूमीला गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली. आगीमुळे अंबरनाथच्या पूर्व भागातील रहिवासी परिसरात धुराचे लोट पसरले होते. उन्हाच्या झळांमुळे दारे खिडक्या उघड्या ठेवणाऱ्या नागरिकांना अचानक आलेल्या या धुरामुळे त्रास सहन करावा लागला. तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. या कचराभू्मीवर ज्वलनशील कचरा टाकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने अनेक वर्ष बेकायदा पद्धतीने वापरलेली मोरिवली भागातील पाईपलाईन रस्त्यावरील कचराभूमी दोन वर्षांपूर्वी बंद केली. या कचराभूमीमुळे आसपासच्या परिसरातील दुर्गंधी पसरत होती. सोबतच या कचराभूमीला अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावर लाखो रूपयांचा खर्च पालिका प्रशासनाने केला. येथील आग नियंत्रणासाठी लाखो रूपयांची माती आणि पाईप टाकण्याचा प्रयोगही पालिकेने केला होता. त्याचाही काही परिणाम झाला नाही. मात्र दोन वर्षांपूर्वी ही कचराभूमी पालिका प्रशासनाने बंद केली होती. त्यानंतर गुरूवारी या कचराभूमीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधार पडल्याने कचराभूमीची आग नियंत्रणात आणण्याच अनेक अडचणी येत होत्या. मात्र अग्नीशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्या आणली. तोपर्यंत अंबरनाथ पूर्वे भागातील मोरिवली. बी केबिन रस्ता या परिसरातील रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर धुर पसरला होता. उन्हाच्या झळा सहन करत असलेल्या नागरिकांनी मोकळ्या हवेसाठी दारे खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा >>>डोंबिवलीत पाथर्ली नाक्यावरील विवाह मंडपाचा वाहतुकीला अडथळा, एक महिन्यापासून मंडप रस्त्यावर
रासायनिक ज्वलनशील पदार्थामुळे आग ?
काही वर्षांपूर्वी रासायनिक कचरा आणि ज्वलनशील पदार्थ प्रक्रिया न करता रस्त्यावर, कचराभूमीवर टाकल्याचे अनके प्रकार समोर आले होते. मात्र गेल्या काही वर्षात हे प्रकार थांबल्याचे दिसून आले होते. गुरूवारच्या आगीच्या घटनेनंतर पुन्हा रासायनिक कचरा किंवा ज्वलनशील पदार्थ उघड्यावर टाकले गेल्याचा संशय बळावला आहे. कचराभूमीच्या खालीही बराचसा ज्वलनशील कचरा दाबला गेला असून संथगतीने सुरू असलेल्या प्रक्रियेनंतर आग लागल्याची शक्यताही असू शकते, असे अग्नीशमन अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले आहे.