लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील आनंद नगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील दशमेश फोम कंपनीला बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीनंतर झालेल्या स्फोटामुळे आसपासच्या कंपनीतील कामगारांनाही खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले.
दशमेश या कंपनीत गादी, वाहनांचे आसन याच्यासाठी लागणारे फोम तयार केले जाते. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. त्यांनतर सर्व कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. काही मिनिटात आगीने रौद्ररूप धारण केले. आग इतकी भीषण होती की संपूर्ण औद्योगीक वसाहतीत काळया धुराचे लोट पसरले.
हेही वाचा… ठाण्यात अपंग चहा स्टाॅल वाटपात घोटाळा? मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्यांचा लाभार्थी यादीत समावेश
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर अग्निशमन दलाच्या पथकांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीने नुकसान झाले आहे.