मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची घोषणा केल्यानंतर ठाणे महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांकडून शहरात विविध विकासकामांची झपाट्याने सुरूवात झाली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांचाही यामध्ये सामावेश आहे. परंतपु एकाचवेळी इतक्या मोठ्याप्रमाणात कामे हाती घेतल्याने शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत शहरातील अंतर्गत मार्गांसह मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, व्यवसायिकांचे हाल होऊ लागले आहे. वागळे इस्टेट भागात अनेकदा दोन -दोन तास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा- ठाणे : म्हारळ नाला थेट उल्हास नदीत; फेसाळ सांडपाण्यामुळे नदी प्रदुषित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात विविध विकासकामांची सुरूवात झालेली आहे. ठाणे महापालिकेने महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानास सुरूवात केली आहे. या अभियानानुसार येत्या सहा महिन्यात ठाणे शहर हे खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विविध अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते आणि सेवा रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे, दुरुस्ती आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू झाली आहे. परंतु शहरात एकावेळी सुरू असलेल्या या कामांमुळे शहरात कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे.
सध्या वागळे इस्टेट भागात रस्ता क्रमांक १६ आणि २२ क्रमांकावर रस्ता दुरूस्तीचे आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे अनेक ठिकाणी ऐकेरी पद्धतीने वाहतूक होते. त्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा ताण नागरिकांना सहन करावा लागत आहे. वागळे इस्टेट भाग हा औद्योगिक वसाहत असून माहिती तंत्रज्ञान कंपन्या, लघु उद्योग, कारखाने आहेत. त्यामुळे ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली भागातून विविध नोकरदार याठिकाणी येत असतात. दररोज या नोकदरारांना रात्रीच्या वेळेत वागळे इस्टेट ते ठाणे स्थानक गाठण्यासाठी दोन-दोन तास लागत आहेत. महिलांचे या कोंडीत सर्वाधिक हाल होत आहे. या मुख्य मार्गावरील कोंडीमुळे दुचाकी, रिक्षास्वार अंतर्गत मार्गावरून वाहतूक करतात. त्यामुळे अंतर्गत मार्गावरही कोंडी होऊ लागली आहे.
ठाणे शहरातील खोपट, वंदना सिनेमा येथील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वंदना सिनेमागृहाजवळ उड्डाणपूल उभारण्यात आले आहे. या उड्डाणपूलाच्या पोहोच रस्त्याजवळ पावसाळ्यात खड्डे पडत असतात. त्यामुळे महापालिकेने याठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू केली आहेत. हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद केल्याने उड्डाणपूलाखालील रस्त्याच्या भागात वाहनांचा भार येऊन कोंडी होत आहे.
हेही वाचा- डोंबिवलीत फडके रस्त्यावर अमेरिकन नागरिकाची महिलांकडून फसवणूक
चरई येथील दगडी शाळेजवळील चौकातही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे चरई भागातही वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटाक बसू लागला आहे. तसेच कोर्टनाका, कारागृह तलावासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या के व्हिला येथील नाल्याच्या बांधकामामुळे ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा रस्ता खोदण्यात आला आहे. येथील वाहतूक उथळसर मार्गे वळविण्यात येत असल्याने उथळसर मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीप्रमाणे घोडंबदर मार्गावर मेट्रो निर्माणाचेही काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेचे कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ काम सुरू आहे. त्यामुळे दररोज रात्री तत्त्वज्ञान विद्यापीठ ते माजीवडा पर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.