ठाणे : ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्ग आणि त्यावरील उड्डाण पुलांवर पावसाळ्याच्या काळात पडलेले खड्डे भरणीसाठी मास्टीकच्या साहाय्याने तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु महामार्ग तसेच उड्डाण पुलांवर खड्डे भरणीसाठी टाकण्यात आलेल्या मास्टीकचे फुगवटे तयार झाले असून काही ठिकाणी रस्ता उंच-सखल झाल्याने अपघातांची भिती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी मास्टीकने भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. तात्पुरत्या मलमपट्टीमुळे ठाणेकरांचा प्रवास संकटात असल्याचे चित्र आहे.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तर, घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या मार्गांवर उरण जेएनपीटी बंदर, गुजरात, नाशिक आणि भिवंडी या शहरांमध्ये अवजड वाहनांची दुपार आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक सुरू असते. याशिवाय, हे दोन्ही मार्ग शहरातील वाहतूकीसाठी महत्वाचे असून या मार्गावरून शहरातील नागरिकांच्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. माजिवाडा ते गायमुखपर्यंतचा रस्ता आणि त्यावरील उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. तर, ठाणे शहरातून जाणारा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. या मार्गांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात आणि यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतो. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमएमआरडीएच्या अखत्यारित येत असले तरी ते ठाणे शहरातून जात असल्याने खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिका टिकेची धनी ठरते. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने गेल्यावर्षी महामार्गावरील खड्डे भरणीची कामे केली. सिमेंट काँक्रीट किंवा इतर साहित्याने पावसाळ्यात बुजवलेले खड्डे उखडतात. यामुळे मास्टीकचा वापर करून खड्डे भरणीची कामे करण्यात आली. तसेच पावसाळ्यापुर्वी अनेक उड्डाण पुलावरील रस्ते मास्टिकच्या साहाय्याने तयार करण्यात आले होते. परंतु या मास्टिकमुळे अनेक ठिकाणी फुगवटे आले आहेत. तर, काही ठिकाणी रस्ता उंच-सखल झाल्याने अपघातांची भिती व्यक्त होत आहे.
घोडबंदर महामार्गावरील वाघबीळ, पातलीपाडा, कापुरबावडी आणि माजिवाडा उड्डाण पुलावर मास्टीकने रस्ते तयार करण्यात आले होते. काही ठिकाणी खड्डे भरणीसाठी मास्टीक वापरले होते. यातील वाघबीळ, पातलीपाडा उड्डाण पुलावर मास्टिक गोळा होऊन त्याचे फुगवटे झाले आहेत. अशीच परिस्थिती घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आहे. ठाण्यातून मुंबईकडे जाताना आनंदनगर चेक नाका भागातही मास्टिकचे फुगवटे आले आहेत. वेगाने येणारी वाहने मास्टिक फुगवटेवरून आदळतात. दुचाकी चालकांचाही तोल जाऊन ते पडतात. त्यामुळे या मार्गांवरील प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे.
घोडबंगर मार्गावरील उड्डाण पुलांवर उन्हामुळे मास्टिक गोळा होऊन फुगवटे झाले आहे. हे मास्टिक काढून तेथे दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी घेण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.