पूर्वा भालेकर, लोकसत्ता

ठाणे – शहराचे केंद्र बिंदू असलेले मासुंदा तलाव पूर्वी केवळ घोडा गाडी आणि नौकाविहारसाठी प्रसिद्ध होते. परंतू, महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे मासुंदा तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तलावाभोवती करण्यात आलेली विद्यूत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधत असून याठिकाणी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तलावाभोवती पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी लहान मुलांच्या करमणुकीकरिता कार्टून्सच्या वेशभूषा परिधान करुन तसेच गोल्डन मॅन च्या वेशभुषेत काही माणसे तलावाभोवती फिरताना दिसतात. तर, ठाणेकरांची संध्याकाळ मंत्रमुग्ध व्हावी यासाठी शहरातील काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत गाण्यांची मैफिल रंगवत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील जवाहिऱ्याची ठाणे, मुंबईतील सराफांकडून एक कोटीची फसवणूक

मासुंदा तलाव हे ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी ठाणेकर सकाळ-संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शहराच्या ऐतिहासिक जडणघडणीत आणि सांस्कृतिक दृष्ट्या मासुंदा तलावाचे मोठे महत्व आहे. मासुंदा तलावाचे संवर्धन व्हावे यासाठी ठाणे महापालिकामार्फत तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेण्यात आला. यामध्ये तलावाभोवती करण्यात आलेली विद्यूत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधत आहे. दिवसेंदिवस मासुंदा तलावाच्या सौंदर्यात भर पडत असून याठिकाणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शनिवार आणि रविवार याठिकाणी मोठी गर्दी होते. अनेकजण आपल्या कुटूंबासह येत असतात. तर, काही मित्र-मैत्रिणींचा समुह असतो.

हेही वाचा >>> कळवा रुग्णालयात एका क्लिकवर कळणार रुग्णांचा पुर्वइतिहास

मुंबई शहरातील मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिय हे तेथील नागरिकांसाठी जसे आकर्षणाचे ठिकाण आहे.तसेच ठाण्यातील मासुंदा तलाव हे आता पर्यटन स्थळ होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी मासुंदा तलावावर विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. नौकाविहार, घोडे सवारी तसेच लहान लहान पालन्यांसह आता कार्टून्सच्या आणि गोल्डन मॅनच्या वेशभुषेत काही माणसे तलावाभोवती फिरताना दिसतात. ही माणसे पर्यटकांची करमणूक करत असतात. तर, पर्यटकही यांच्या सोबत सेल्फी काढण्यात मग्न झालेली दिसतात. दररोजच्या तुलनेत शनिवार आणि रविवार याठिकाणी सर्वाधिक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

तलावाभोवती संगीताची मेजवानी

तलावाभोवती फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सांगितीक मेजवानीचा आस्वाद घ्यायला मिळत आहे. ठाणे शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या समुहाने एकत्रित येत सुर संगम नावाचा कार्यक्रम सुरु केला आहे. यामध्ये हे सर्व मंडळी सायंकाळच्या वेळी तलावाभोवती एकत्रित येत गाणी सादर करतात. या कार्यक्रमाच्या मार्फत नागरिकांचे उत्तम मनोरंजन होते. अनेक मंडळी खास गाणी ऐकण्यासाठी याठिकाणी दररोज सायंकाळी येत असतात, असे सुर संगम समुहातील दिपक कोळेकर यांनी सांगितले.

मासुंदा तलावाभोवती फेरफटका मारण्यासह मनोरंजनासाठी विविध गोष्टी उपलब्ध

मासुंदा तलावाभोवती फेरफटका मारण्यासह मनोरंजनासाठी विविध गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. हे पाहून खरचं खूप छान वाटते. पूर्वी तलावपाळी भोवती विशेष करुन प्रेमीयुगलचं दिसून यायचे. परंतू, आता तलावपाळी भोवती झालेल्या या सुधारणेमुळे लहानमुलांना याठिकाणी फिरायला घेऊन येणे शक्य झाले आहे. घोडा गाडी, नौका विहार सह अनेक मनोरंजनाची साधने आता याठिकाणी उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती आपल्या कुटूंबासह मासुंदा तलावाच्या ठिकाणी फिरायला आलेल्या एका तरुणाने दिली.

मासुंदा तलाव हे ठाण्याचे मानबिंदू आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार आणि आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनेखाली मासुंदा तलावाचे सुशोभिकरण आणि हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला. जेणेकरुन याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना मनोसोक्त फिरता येईल. तसेच याठिकाणी आणखी वेगळे काही करता येईल का याकडे लक्ष देण्यात येईल. – संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त ठाणे महापालिका.

Story img Loader