घरबसल्या अॅपद्वारे पैशांची, आकडय़ांची देवाणघेवाण; मटका व्यावसायिकांची ‘स्मार्ट’ शक्कल
शहरातील गल्लीबोळात छुप्या पद्धतीने चालविण्यात येणारे मटका जुगाराचे अड्डे आता घरबसल्या मोबाइलद्वारे चालविले जाऊ लागले आहेत. ठाणे पोलिसांच्या एका कारवाईतून ही बाब उघड झाली आहे. घरबसल्या मटका चालविण्यासाठी काही हस्तकांनी अॅप विकसित केले होते. त्याआधारे मटका जुगार चालविण्यात येत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मटक्याच्या अड्डय़ावरील चिठ्ठी, फळा, खडू किंवा मार्कर वापरण्याची पद्घत कालबाह्य़ झाली असून, या साहित्याची जागा आता मोबाइल आणि त्यातील ‘अॅप’ने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
घोडबंदर येथील ब्रह्मांड भागातील स्वस्तिक पार्कमधील एका घरात पंधरा दिवसांपूर्वी ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पथकाने धाड टाकून दीपक छापरू याला ताब्यात घेतले. या चौकशीत तो घरामधूनच मोबाइलद्वारे मटका जुगार चालवीत असल्याची माहिती समोर आली. त्याच्या घराची झडती घेतली असता फुलस्केप कागदाचे गठ्ठे, तीन मोबाइल आणि ४२ हजारांची रोख रक्कम सापडली. तसेच जप्त करण्यात आलेल्या कागदांवर इंग्रजी तसेच मराठी भाषेत आकडे तसेच सांकेतिक शब्द लिहिल्याचे आढळले असल्याची माहिती घेवारे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दीपकची जामिनावर सुटका झाली आहे.
दीपक छापरू हा घरबसल्या मोबाइलद्वारे मटका जुगार चालवीत होता. जुगार खेळणारे अनेक जण त्याच्याकडे मोबाइलवर फोन करून मटक्यासाठी क्रमांक नोंदवीत होते. हेच क्रमांक तो कागदावर नोंदवून ठेवायचा आणि या जुगाराच्या व्यवहाराच्या आर्थिक नोंदीही कागदावर करीत होता. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तिन्ही ठरलेल्या वेळेतच तो मटका जुगारासाठी क्रमांक घ्यायचा. हा मटका चालवण्यासाठी त्याने एक अॅपही विकसित केले होते. विशेष म्हणजे, जुगाराचे क्रमांक लावण्यासाठी किंवा निकाल सांगण्यासाठी तो कुणालाही मोबाइलवर संपर्क साधत नव्हता. जुगाराचे आकडे लावणाऱ्या व्यक्तीच त्याला दूरध्वनी करीत असल्याचेही उघड झाले आहे.
मटका जुगाराचे अड्डे मोबाइलवर
मटका जुगाराचे अड्डे आता घरबसल्या मोबाइलद्वारे चालविले जाऊ लागले आहेत.
Written by नीलेश पानमंद

First published on: 16-04-2016 at 06:10 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matka gambling betting on mobile