भाईंदरमध्ये मिळणाऱ्या कोल्हापुरी मिसळीचे मिश्रण थोडे हटके आहे. या मिसळीचे नावच मुळात मटकी मिसळ आहे. त्यामुळे अर्थातच यात वाटाण्याच्या जागी मटकीचा समावेश असतो. त्यात खास कोल्हापुरी पध्दतीचा रस्सा आणखी रंगत आणतो.

मिसळ म्हटले की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही. त्यातही मिसळ झणझणीत असेल तर मग त्याची लज्जत काही औरच असते. अशीच चटकदार झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तुम्हाला भाइंदर पश्चिम येथील साठ फुटी रस्त्यावर श्री स्वामी समर्थ कोल्हापुरी मटकी मिसळला नक्कीच भेट द्यायला हवी. बघितल्यावर एक साधी हातगाडी वाटली तरी येथील मिसळीच्या चवीने भल्याभल्यांना आकर्षित केले आहे.  सकाळच्या न्याहारीसाठी अनेकांची पहिली पसंती या कोल्हापुरी मिसळीला मिळत आहे.

मिसळ म्हटले की पुणेरी आणि कोल्हापुरी मिसळ अशी सरसकट ओळख आहे. मुंबईत मिळणाऱ्या मिसळीपेक्षाही मिसळ थोडी हटके आहे. काही ठिकाणी वाटाणा, बटाटे आणि काही ठिकाणी पोहे एकत्र करून त्यात फरसाण आणि रस्सा ओतला की झाली तयार मिसळ. वरून कांदा आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे पेरले जाते. मात्र, भाईंदरमध्ये मिळणाऱ्या कोल्हापुरी मिसळीचे मिश्रण मात्र वेगळे आहे. या मिसळीचे नावच मुळात मटकी मिसळ आहे. मोड आलेली मटकी, कांदा, लसूण आणि खास कोल्हापुरी मसाल्यापासून तयार केलेल्या रश्शात उकळली जाते. रश्शासाठी वापरण्यात येणारे कोल्हापुरी मसाले घरगुती पद्धतीने तयार केलेले असल्याने त्याची चवदेखील वेगळीच लागते. उकळलेली मटकी मग प्लेटमध्ये काढून खवय्यांच्या पसंतीप्रमाणे त्यात तिखट रस्सा कमी अधिक प्रमाणात घातला जातो. त्यावर विशिष्ट प्रकारचे कोल्हापुरी नमकीन घालून सोबतीला पाव आणि आवडीप्रमाणे कांदा तसेच कोथिंबीर घालून ग्राहकाला पेश केले जाते. मिसळीचा लालभडक रंगच पाहून तोंडाला पाणी सुटते आहे. मिसळ जेवढी तिखट तेवढी त्याची लज्जत अधिक अशी या मिसळीची खासीयत आहे.

भाईंदर पश्चिमेकडील साठ फुटी रस्त्यावर रेल्वे फाटकाकडून जैन मंदिरकडे जाताना आयसीआयसीआय बँक मागे टाकली की लगेचच डाव्या हाताला श्रीस्वामी समर्थ कोल्हापुरी मटकी मिसळ नावाचा फलक असलेली हातगाडी नजरेस पडते. सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत कोल्हापुरी मिसळ मीरा-भाइंदरमध्ये मिळण्याचे हे एकमेव ठिकाण. मिसळ खाण्यासाठी खवय्ये खास मुंबहूनदेखील येतात अशी माहिती मूळचे कोल्हापूर जवळील निपाणीचे आणि आता भाइंदरमध्ये आपल्या अस्सल मराठमोळ्या मिसळीने अनेकांच्या रसवंतीचे चोचले पुरवणारे प्रशांत शहा सांगतात.

श्रीस्वामी समर्थ कोल्हापुरी मटकी मिसळ

साठ फुटी रस्ता, रेल्वे फाटक, भाईंदर (पश्चिम)