लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पटूंना मुंबई क्रीकेट असोशिएशन (एमसीए) मध्ये नावनोंदणी करण्यासाठी थेट वानखेडे स्टेडियम गाठावे लागत होते. मात्र, हे केंद्र आता कळव्यातील खारलँड मैदानात सुरू करण्यात आले आहे. या मैदानात एमसीएची निवड चाचणी सुरू असून या चाचणीसाठी सुमारे ६०० क्रिकेटपटूंनी आपली हजेरी लावली. या केंद्रामुळे जिल्ह्यातील मुलांचा प्रवास वेळ आणि खर्चात बचत होण्यास मदत झाली आहे.

मुंबई क्रीकेट असोसिएशन ही मुंबईमधील क्रिकेटसाठी नियामक संस्था आहे. यापुर्वी या संस्थेला बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखले जात होते. ही संस्था मुंबई आणि ठाणे, नवी मुंबई यासारख्या आसपासच्या परीसरांकरीता आहे. तिचे मुख्यालय चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम येथे आहे. या संस्थेचे ठाणे जिल्ह्यात नोंदणी केंद्र नव्हते. यामुळे या संस्थेमध्ये नावनोंदणी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील क्रीकेटपटूंना थेट वानखेडे स्टेडियम गाठावे लागत होते. यामध्ये क्रीकेटपटूंचा प्रवास वेळ वाया जात होता आणि या प्रवासासाठी पैसेही खर्च होत होते. दरम्यान, ही अडचण दूर करण्यासाठी ठाण्यात संस्थेचे केंद्र उभारण्यात यावे, यासाठी एमसीएचे सदस्य, आमदार जितेंद्र आव्हाड हे आग्रही होते. यासाठी त्यांचा पाठपुरावाही सुरू होता.

कळवा रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या खारलँड मैदान हे ठाणेकर क्रिकेटपटूंची पंढरी झाले आहे. अनिरुद्ध क्रिकेट अकादमीच्या वतीने या मैदानाचे संचालन करण्यात येत असते. या मैदानात प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी एमसीएच्या अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. हे मैदान रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्याने येथे निवड चाचणी घेण्यात यावी, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. त्यानंतर येथे निवड चाचणीला सुरुवात करण्यास एमसीएने परवानगी दिल्याने ठाणे जिल्ह्यातील क्रीकेटपटूंची मोठी अडचण दूर झाली आहे. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील क्रिकेटपटूंना आता एमसीएमध्ये आपली नावनोंदणी करण्यासाठी मुंबईत जावे लागणार नसून त्यांची नाव नोंदणी कळव्यातील खारलँड मैदानात होणार आहे.

निवड चाचणी सुरू

सध्या एमसीएचे अधिकृत प्रतिनिधी दर्शन भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार संग्राम शिर्के, नितीन पालांडे, चंद्रकांत भाटकर, कुलदीप यादव, सुशील मापुस्कर आणि समीर मांजरेकर या प्रशिक्षकांच्या उपस्थितीत १४ वर्षाखालील मुले आणि १७ वर्षाखालील मुली यांची निवड चाचणी सुरू आहे, अशी माहिती विरेश तावडे यांनी दिली.