सप्तसुरांची गंमतच वेगळी असते. सुरांच्या या माळेत जेव्हा शब्द गुंफले जातात, तेव्हा श्रोत्यांच्या मनात गडद भावना दाटून येतात. अशाच हळव्या भावनांनी भारलेली सुरेल संध्याकाळ गेल्या शनिवारी डोंबिवलीकर रसिकांनी अनुभवली. बाहेर पावसाची रिमझिम सुरू असताना सुयोग सभागृहात शब्दसुरांची बरसात सुरू होती. जीवनाचे सार सांगून जाणाऱ्या साध्या सोप्या रचना आणि त्या अधिक अर्थपूर्ण करणारे सूर यांची अनोखे रंग यानिमित्ताने अनुभवता आले.
‘रघुलीला एन्टरप्राइज’ या संस्थेच्या वतीने ‘जीवनगाणे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवातच गायत्री शिधये यांनी ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ या गाण्याने केली. त्यानंतर ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ या गाण्याने रसिकांचा मनाचा ठाव घेतला. मग हा सिलसिला असाच पुढे सुरू राहिला. धनंजय म्हसकर यांनी ‘आताच अमृताची बरसून रात्र गेली तसेच ‘पहाटे पहाटे मला जाग आली’ हे गाणे सादर केले. सामान्य जीवनातील गोष्टी जेव्हा कवी किंवा संगीतकार रसिकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा रसिक त्या काव्यरचनेला तसेच त्या गाण्याला आपल्या हृदयात स्थान देतो. केतकी भावे हिने गायलेल्या ‘आज जाने की जिद ना करो’ या गाण्याने मैफलीला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्या सुरांनी रसिक श्रोत्यांना मैफलीत खिळवून ठेवले. सुरांची ही मोहिनी विलक्षणच होती. बाहेर पावसाच्या धारा सुरू असताना सभागृहात सुरांच्या वर्षांवाने रसिक चिंब झाले होते.
हृषीकेश अभ्यंकर यांनी गायलेल्या ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ’ या गाण्याने मैफलीत वेगळे रंग भरले. महाराष्ट्राचे लाडके बाबुजी-सुधीर फडके यांनी अजरामर केलेले हे गाणे हृषीकेशने तितक्यात ताकदीने सादर केले. जाणकर रसिकांनी त्याच्या या प्रयत्नाला दिलखुलास दाद दिली. मग धनंजय म्हसकर यांनी ‘हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा’ हे गाणे सादर केले. त्यानंतर धनंजय आणि गायत्री शिधये यांनी ‘जो वादा किया है’ हे गाणे सादर केले. प्रेक्षकांनी या गाण्याला वन्समोअर दिला. यावेळी निवेदक मयुरेश साने याने संदीप खरे यांच्या ‘जपत किनारा शीड सोडणे नामंजूर’ या गाण्यावर ‘जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर’ हे विडंबन काव्य सादर केले. डोंबिवलीहून सीएसटीपर्यंत जाताना प्रवाशांचे कसे हाल होतात, मुंबईकरांची लाइफ लाइन असणारी रेल्वे मध्येच कशी आजारी पडते, यावर अतिशय मार्मिक भाष्य या रचनेद्वारे त्यांनी केले. प्रेक्षकांनीही त्या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर हृषीकेशने ‘देवा तुझी मुले अशी का रे भांडतात’ हे गाणे सादर केले. त्यानंतर त्याने सादर केलेल्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकताना रसिकांच्या डोळ्यात पाणी आले तर केतकी भावे यांनी गायलेल्या ‘वाजले की बारा’ या गाण्यालाही रसिकांनी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे अशी दाद दिली. गायक तर सुंदर गातच होते, मात्र वादकांनीही त्यांना उत्तम साथ दिली. अमेय ठाकूर देसाई याने तबल्यावर सुरेख साथ केली. झंकार कानडे आणि सुखदा भावे-दाबके यांनी किबोर्डवरून सुरांची साथ देत गाणे सुरेल केले. ढोलक ढोलकी शिवाय लावणी होऊच शकत नाही. या वाद्यांची साथ अमित देशमुख आणि सुशांत बर्वे यांनी केली. ‘जीवनगाणे’ या कार्यक्रमाची सांगता हृषीकेशने गायलेल्या ‘माझे जीवनगाणे’ या गाण्याने झाली.
सांस्कृतिक विश्व : अर्थपूर्ण गाण्यांची सूरमयी संध्याकाळ
सप्तसुरांची गंमतच वेगळी असते. सुरांच्या या माळेत जेव्हा शब्द गुंफले जातात, तेव्हा श्रोत्यांच्या मनात गडद भावना दाटून येतात. अशाच हळव्या भावनांनी भारलेली सुरेल संध्याकाळ गेल्या शनिवारी डोंबिवलीकर रसिकांनी अनुभवली. बाहेर पावसाची रिमझिम सुरू असताना सुयोग सभागृहात शब्दसुरांची बरसात सुरू होती. जीवनाचे सार सांगून जाणाऱ्या साध्या सोप्या रचना आणि त्या अधिक अर्थपूर्ण करणारे सूर यांची अनोखे […]
Written by भाग्यश्री प्रधान

First published on: 05-07-2016 at 05:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meaningful songs concert in thane