उल्हासनगरः प्रदुषणाने गेल्या काही वर्षात गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी आता पुन्हा नव्याने प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून नदीत टाकल्या जाणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुलांवर लोखंडी जाळ्या लावल्या जात आहेत. नाद्यावर फेरिवालेही व्यवसाय करत रात्री कचरा टाकतात. त्यामुळे त्यांनाही येथून हटवण्यात आले असून त्या ठिकाणचा परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. नागरिकांनाही नदी कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाते आहे.
अंबरनाथच्या टाहुलीच्या डोंगरात उगम पावणारी आणि उल्हासनगरमार्गे कल्याणपर्यंत वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. गेल्या काही वर्षात नागरी सांडपाणी, जीन्स धुलाई कारखाने यामुळे नदीची दुरावस्था झाली. नदी मिसळल्या जाणाऱ्या रसायनांमुळे अनेकदा नदीच्या पाण्याचे रंग बदलले. अनेकदा यात फेस पाहयला मिळाला. गेल्या काही वर्षात कंपन्यांचेही प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी यात सोडले जात असल्याने नदी काठच्या नागरिकांना रासायनिक वायुचा सामना करावा लागला आहे. वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संघटना आणि व्यक्ती वर्षांनुवर्षे काम करत आहेत. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचे प्रदुषण कमी झालेले नाही. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात या नदीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कचरा आणि निर्माल्य टाकले जाते. हाच कचरा प्रदुषण वाढवतो. अनेकदा जलशुद्धीकरण केंद्रात हा कचरा अडकतो. त्यामुळे नदी प्रदुषण रोखण्यासाठी उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी नुकतीच नदी संवर्धन अभियानात सहभाग घेतला. नदी संवर्धन समिती, वृक्ष फाऊंडेशन अशा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाला हजेरी लावली. खन्ना कंपाऊंड येथील पुलावरून नदीत कचरा टाकला जात असल्याने येथे पालिकेच्या माध्यमातून जाळ्या लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या हटवण्यात आल्या आहेत. तसेच येथे असलेले बंद अवस्थेतील वाहने, भंगार हटवून येथे शोभिवंत झाडेही लावण्यात आले आहेत. तर नागरिकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पालिका, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र नागरिकांनाही नदी परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवावा. कचरा नदीत टाकू नये तसेच वर्गीकरण करून पालिकेच्या घंटाघाड्यांमध्ये द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी खन्ना कंपाऊंड, राजीव गांधी नगर, सातारा कॉलनी, गऊबाई पाडा, ढालेपाडा, मीनाताई ठाकरेनगर, शांतीनगर परिसरात उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.