कत्तल शुल्क, विक्री परवाना शुल्कात वाढीचा पालिकेचा प्रस्ताव
जनावरांच्या कत्तल शुल्कात प्रतिनग १० रुपये आणि विक्री परवाना शुल्कात १००-२०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. याव्यतिरिक्त बेकायदा बांधकामांतील मासळी, मटण आणि चिकन विक्रेत्यांना दीडपट वाढीव परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. येत्या सर्वसाधारण सभेत तसा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून त्यामुळे मांसाहार महागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पशुवैद्यकीय विभागाकडून शहरातील मासांहार विक्री दुकानदारांना कत्तल, विक्री परवाना शुल्क आकारले जाते. २०१५ मध्ये त्याचे दर निश्चित करण्यात आले होते. ३१ मार्च २०१९ पर्यंत ते लागू राहणार आहेत. त्यामुळे पालिकेने सुधारित दरांचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार कत्तल शुल्कात प्रत्येकी १० रुपयांची वाढ करण्यात आली असून मोठय़ा जनावरांसाठी (म्हैसवंश) प्रतिनग १७० रुपये तर लहान जनावरांसाठी प्रतिनग ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. महापालिका दुकानदारांना एक वर्षांसाठी विक्री परवाना देते. त्यासाठी दुकानदारांना वार्षिक शुल्क आकारले जाते. ते मोठय़ा जनावरांसाठी २४०० रुपये तर लहान जनावरांसाठी ११०० रुपये इतके होते. नव्या प्रस्तावानुसार मोठय़ा जनावरांसाठी २५०० रुपये तर लहान जनावरांसाठी १२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
तीन वर्षांनंतर कत्तल शुल्क आणि परवाना शुल्कात करण्यात आलेल्या या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याविषयी विक्रेत्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
परवाना शुल्क प्रकार सध्या प्रस्तावित
कोंबडी विक्री १५०० १७००
मासळी विक्री ९५० ११००
डुक्कर विक्री २४०० २५००
शीतपेटी २४०० ३०००
शीतगृहे १५००० १७०००