आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्युषण काळाबाबत गतवर्षी वादळ उठल्याने यंदा भाजपची नरमाईची भूमिका

जैन समाजाच्या पर्युषण काळातील मांसविक्रीच्या कालावधीवरून गेल्या वर्षी उठलेल्या वादळात भरडले गेल्यानंतर भाजपने यंदा शासकीय नियमानुसार दोनच दिवस मांसविक्री बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्तारूढ भाजपने पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे पडसाद देशभर उमटले होते. आता २९ ऑगस्टपासून पर्युषण काळ सुरू होत असल्याने यंदा भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वाचे डोळे लागून राहिले आहेत. परंतु गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा भाजपने याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये जैन समाजाची संख्या लक्षणीय आहे. साहजिकच प्रत्येक राजकीय पक्ष या समाजाच्या मतांवर डोळा ठेवून असतो. त्यामुळे साहजिकच गेल्या वर्षी सत्तारूढ भाजपने पर्युषण काळात तब्बल आठ दिवस मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शासकीय नियमानुसार केवळ दोनच दिवस मांसविक्री बंद करता येते. परंतु जैन समाजाकडून हा कालावधी वाढविण्याची मागणी करण्यात आल्याने मतदारांना खूश करण्यासाठी भाजपने हा कालावधी वाढवला. मात्र या निर्णयाला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेच सर्वप्रथम कडाडून विरोध केला. मीरा-भाईंदरमध्ये आगरी, कोळी समाज भूमिपुत्र असल्याने अशा पद्धतीने जबरदस्तीने असा निर्णय लादता येणार नसल्याची आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली. या भूमिकेला मग इतर सर्वच पक्षांनी भक्कम पाठिंबा दिला. परंतु भाजप आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलने सुरू झाली. जैन समाजाविरुद्ध इतर अशी स्फोटक स्थिती मीरा-भाईंदरमध्ये निर्माण होऊन आंदोलनाचे लोण देशपातळीवर पसरले.

महापालिका आयुक्तांनी यानंतर हा निर्णय शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. शासन जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे आयुक्तांनी जाहीर केले. परंतु पर्युषण काळ सुरू होईपर्यंत शासनाकडून मत व्यक्त करण्यात आले नाही. परिणामी पर्युषण काळात शासकीय नियमानुसार दोनच दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. दरम्यान, उच्च न्यायालयानेही दोनच दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय दिला. या सर्व प्रकारांत भाजपने जैन समाजाच्या बाजूनेच ठाम भूमिका घेतल्याने ते एकाकी पडले आणि सर्वाच्याच टीकेचे धनी झाले. मात्र आंदोलनात पुरते पोळले गेल्याने यंदा भाजपने सावध पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पयुर्षण काळातील मांसविक्रीचा कालावधी वाढविण्यापेक्षा या काळात शासकीय नियमाची अंमलबजावणी करावी अशी भूमिका भाजपने घेतली असल्याने यंदा या काळात मांसविक्रीची दुकाने केवळ दोनच दिवस बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन गेल्या वर्षी मांसविक्रीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्या वेळी या निर्णयावरून मोठय़ा प्रमाणावर राजकारण करण्यात आले. त्यामुळे या वर्षी शासकीय नियमाचे पालन करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.  जे मांसविक्री करणारे दुकानदार दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस मांसविक्री बंद ठेवतात, त्यांना जैन समाजाकडून नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे ज्यांची इच्छा असेल त्यांना जास्तीतजास्त दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे केवळ आवाहन केले जाईल.

– नरेंद्र मेहता, आमदार, मीरा-भाईंदर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meat sales banned from two days in paryushan period