सेवानिवृत्त स्नेहलता हरळीकर यांचा अनोखा प्रयोग; अंबरनाथ ते अमेरिका असा सुगंधी होणार
किरकोळ दुखल्या खुपल्यावर हमखास औषध असणारा आजीबाईचा बटवा आताच्या विभक्त कुटुंब पद्धतीत दुर्मीळ झाला असला तरी तशा बटव्यात अगदी चपखलपणे बसेल असे एक स्वादिष्ट आणि सुगंधी औषध अंबरनाथमधील एका सेवानिवृत्त महिलेने तयार केले आहे. सुग्रास जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून पसंत केल्या जाणाऱ्या मसाला पानातील ‘सुपारी’ व्यर्ज करून एक टिकावू सुगंधी पान त्यांनी तयार केले आहे. मुंबईतील बहुतेक सर्व ग्राहक पेठांमधून हजारो ग्राहकांच्या घरात गेलेल्या या मधुर पानाची कीर्ती आता थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे या औषधी मुखवासाची विक्री करण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांनी प्रमाणपत्रही मिळविले आहे.
कृषि व ग्रामीण विकास बँकेत ३६ वर्षे नोकरी करून शाखा व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेल्या स्नेहलता हरळीकर यांनी सात वर्षांपूर्वी त्यांच्या अंबरनाथ येथील खेर विभागातील राहत्या घरातील गच्चीवर हा उद्योग सुरू केला. त्यांचे पती श्रीपाद हरळीकर त्यांना मदत करू लागले. सेवानिवृत्तीनंतर हाती असलेला मोकळा वेळ सत्कार्यी लावावा, हा त्यामागचा त्यांचा मुख्य हेतू होता. या उद्योगाने ते साध्य झालेच. शिवाय या मधुर पानाची कीर्ती जगभरात पोहोचल्याचा आनंद आणि समाधान हरळीकर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतो.
साधारण गच्चीवर ऊन असताना ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत हरळीकर दाम्पत्य हे मधुर मसाला पान तयार करतात. बाजारातून उत्तम प्रतीची पाने आणून ते स्वच्छ धुवून चिरतात. ती पाने साखरेच्या पाकात दिवसभर भिजवून ठेवली जातात. त्यात गुंजेचा पाला, ज्येष्ठ मध, लवंग, वेलची, दालचिनी, गुलकंद, कात, चुना, बडीशेप, धनाडाळ टाकून त्याचा एकत्र लगदा करून ठेवतात. या मिश्रणाला तीन ते चार दिवस चांगली उन्हं दाखवली जातात. त्यानंतर थंडक टाकून हे मिश्रण पाकिटबंद केले जाते. सर्वसाधारण मसाला पान नाशवंत असते. ते लगेच खावे लागते. मात्र अशाप्रकारे वाळविलेले मधुर पान किमान तीन महिने टिकते. अन्न आणि औषध प्रशासनाने तसे रिसतर प्रमाणीत केले आहे. त्यामुळे कधीही, कुठेही हे पान घेऊन जाता येते.
अवघ्या सात वर्षांत कोणतीही जाहिरात न करता या सुगंधी पानाची कीर्ती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. मुंबईतील बोरिवली, अंधेरी, सांताक्रूझ, मुलुंड तसेच वसई येथील ग्राहक पेठांमधून या मधुर पानाला विशेष मागणी आहे. मुंबई-ठाण्यातील ग्राहक आपल्या परदेशातील नातेवाईक आणि मित्रांना हे मधुर पान भेट म्हणून पाठवितात. त्यामुळे अमेरिका, युरोप तसेच आखाती प्रदेशातील देशात अंबरनाथच्या हरळीकर आजीने केलेले हे रूचकर आणि औषधी पान आवडीने खातात . मागणी वाढल्याने आता उद्योगाचा व्याप वाढल्याने रोजगारही मिळाला आहे. पानाच्या जोडीने सांगडी मिरचीचेही उत्पादन त्यांनी सुरू केले आहे.
पर्यावरण स्नेह आणि ऊर्जा संवर्धन
इमारतीच्या गच्चीवर पडणाऱ्या भरपूर उन्हाचा स्नेहलता हरळीकर पुरेपुर वापर करतात. गेली कित्येक वर्षे त्या घरचा स्वयंपाक सौर चुलीवर करतात. घरातील ओला कचरा घरच्या बागेसाठी खत म्हणून वापरतात. चहा करताना आधी साखर न टाकता फक्त चहा पावडर उकळून घेऊन तो चोथा गच्चावरील झाडांना घालतात.