भाग्यश्री प्रधान
१७ हजार चौरस मीटर जागेत नव्या इमारतीची उभारणी; रेल्वे आरक्षण केंद्रांसह विविध सुविधा
दररोज शेकडो नागरिकांचा राबता असलेल्या ठाणे जिल्हा न्यायालयाला नवीन वर्षांत सुसज्ज इमारत मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ४६ कोटी रुपये खर्च करून सुमारे १७ हजार चौरस मीटर जागेत ही इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त योगाभ्यास आणि ध्यान धारणा कक्ष उभारला जाणार आहे. आवारात विविध बँकांची एटीएम, रेल्वे आरक्षण केंद्र आणि उपाहारगृहदेखील असणार आहे.
ठाण्यातील कोर्टनाका येथे असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत जिल्ह्य़ातील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा निपटारा होतो. इमारत ४५ वर्षे जुनी आहे. काही दिवसांपूर्वी प्लास्टर कोसळले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सातत्याने दुरुस्ती केली जाते. तरी जिल्ह्य़ातील न्यायालयीन प्रकरणांची व्याप्ती आणि या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता नवी इमारत उभारली जावी, यासाठी येथील वकिलांच्या जिल्हा संघटनेमार्फत प्रयत्न करण्यात येत होते. राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर मान्य केली आहे.
नवी इमारत नव्या सुविधा
* १० मजल्यांच्या या इमारतीत ४७ न्यायाधीशांसाठी स्वतंत्र दालने बांधण्यात येणार आहेत. बार काऊन्सिल, अॅण्टी चेंबरसाठी दालन तयार करण्यात येणार आहे.
* तळमजल्यावर वाहनतळ उभारण्यात येईल, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न मिटेल.
* सहा ते सात ग्रंथालये, प्रत्येक मजल्यावर एक प्रतीक्षा केंद्र बांधण्यात येईल.
* सात उद्वाहनांची सोय करण्यात येणार आहे. इमारतीच्या चारही बाजूंनी जिने असतील.
* कर्मचाऱ्यांसाठी ध्यानधारणा दालन असेल.
* साक्षीदारांसाठीदेखील वेगळे दालन बांधण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निविदा काढल्या आहेत. इमारत बांधकाम करताना अनेक सोयीसुविधांचा विचार करण्यात आला आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बँकेचे एटीएम, रेल्वे आरक्षण आणि कॅन्टीनची सोय करण्यात येणार आहे.
– अनिता परदेसी, कार्यकारी अभियंता, ठाणे सा. बां. विभाग
* इमारतीचे क्षेत्रफळ १६,८१५.४० चौरस मीटर
* अंदाजे खर्च ४६ कोटी ६१ लाख ३६ हजार १६८ रुपये