मीनाताई ठाकरे उद्यान, बदलापूर (पूर्व)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गसान्निध्य या एकाच आकर्षणाने दोन वर्षांपूर्वी मुंबईपासून दूर असूनही चाकरमान्यांनी बदलापूरला राहणे पसंत केले. त्यातून या गावाचे झपाटय़ाने शहरात रूपांतर झाले. आता तर मुंबई महानगर क्षेत्रात सर्वात किफायतशीर दरात घरे मिळत असल्याने बदलापूरची अतिशय झपाटय़ाने महानगराकडे वाटचाल सुरू झाली आहे. मात्र या वाढत्या नागरीकरणाने येथील हिरवळीला धक्का लागण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करू लागले आहेत. शहराला मोकळा श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन पुरविणाऱ्या उद्यानांच्या देखभालीकडेही स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था अतिशय भकास झाली आहे.

लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी निसर्गसंपन्न असे वातावरण तर तरुणांसाठी जॉगिंग ट्रॅक अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असलेले बदलापुरातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उद्यानांपैकी मीनाताई ठाकरे हे एक मुख्य उद्यान आहे. येथे झाडांच्या सोबतीने ज्येष्ठांची मैत्री आणि त्यांच्यातील अनोखे नातेही बहरते आहे. लहानग्यांचे एक वेगळे विश्व येथे पाहायला मिळते. मात्र गेली काही वर्षे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे उद्यानाला अवकळा प्राप्त झालेली दिसून येते.

शहरीकरणाच्या उंबरठय़ावर असलेल्या निसर्गसंपन्न बदलापूर शहरात १९९९ मध्ये या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते. जवळपास सात ते आठ गुंठे परिसरात पसरलेले हे उद्यान अनेक कारणांमुळे विशेष ठरते. उद्यानात विविध प्रकारची छोटी मोठी अशी चारशेहून अधिक झाडे आहेत. त्यात काही फुलांची तर काही शोभेची आहेत. मात्र पहाटे आणि सायंकाळच्या वेळी येथील वातावरण प्रसन्न करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अनेक लहान झाडे कुंडय़ांमध्येही लावलेही आहेत. त्यांच्यामुळेही उद्यनाच्या सौंदर्यात भर पडते. उद्यानाच्या चारही बाजूला चांगला जॉगिंग ट्रॅक आहे. जवळपास एक किलोमीटरचा असलेला हा ट्रॅक पहाटे आणि सायंकाळी धावणाऱ्यांसाठी उत्तम आहे. पहाटेच्या गारव्यात या उद्यानात फिरताना मन्न प्रसन्न होते, तर प्रदूषणापासून काही तास सुटका मिळत असल्याची भावना येथे येणारे अनेक जण व्यक्त करतात.

उद्यानात मुलांसाठीही खेळण्याचे साहित्य आहे. काळाच्या ओघात हेही जुने आणि तोकडे पडत असले तरी लहान मुलांची संख्याही यामुळे येथे मोठी असते. ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवांना अनेकदा येथे घेऊन येताना दिसतात. त्यामुळे लहानग्यांपासून ते अगदी ज्येष्ठांपासून सर्वच वयोगटातील उद्यानप्रेमी येथे येताना दिसतात. मात्र लहानग्यांसाठी असलेल्या खेळाच्या साहित्याची काळजी घेऊन त्याच्याही डागडुजीची गरज येथे येणारे ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात. उद्यानात काही वर्षांपूर्वी अनेक नवनवे प्रयोग करण्यात आले होते. त्यातील बहुतेक आता बंद पडले आहेत. त्यात पाला पाचोळ्यापासून खतनिर्मितीचाही समावेश होता. मात्र आता खतनिर्मिती बंद पडलेली दिसते. मात्र त्याचवेळी उद्यानाच्या आसपास असलेल्या गृहसंकुलांसाठी येथे एक पर्जन्य जलसंचयनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. आताही आसपासच्या एक डझनहून अधिक इमारतींना या प्रयोगातून बारमाही पाणी पुरवठा केला जातो. एखाद्या उद्यानात यशस्वीपणे राबविला गेलेला हा बदलापुरातील एकमेव प्रयोग असावा.

अंधार आणि असुविधा

उद्यानाची वेळ सायंकाळपर्यंत असली तरी अंधार झाल्यानंतर येथे फिरणे मुश्कील होते. कारण उद्यानात प्रकाश व्यवस्थाच नाही. उद्यानात विजेचे खांब दिसतात, मात्र त्यांची वाट लागली आहे. अनेक खांब पडलेल्या अवस्थेत तर अनेक दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही लोखंडी सांगाडेही आहेत. त्यामुळे उद्यानात खेळणाऱ्या लहानग्यांना इजा होण्याची शक्यता आहे. उद्यानाची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी तुटली आहे. लोखंडी जाळ्यांनी संरक्षक भिंत तयार करण्यात आली होती. मात्र काही समाजकंटकांनी ती तोडलेली दिसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवेश करून टवाळखोर आत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बंद कारंजे सुरू होण्याची प्रतीक्षा

उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या स्रोताचा उपयोग करून येथे कारंजे उभारण्यात आले होते. मात्र काही वर्षांतच ते बंद पडले. या प्रकल्पासाठी पालिकेचा मोठा निधी वापरण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या दुरुस्तीचाही प्रयत्न झाला. मात्र ज्यांच्या संकल्पनेतून उद्यानाची निर्मिती झाली, ते सत्तेवरून पायउतार होताच या कारंजाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे एकेकाळी उद्यानाची शान असलेला भाग आता फक्त जागा व्यापून राहिला आहे. कारंज्याभोवती कुंडय़ा ठेवून सुशोभीकरणाचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिक कारंजे पूर्ववत सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

उद्यानाला अद्ययावत ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या उद्यानामुळे आमच्यासारख्या अनेक ज्येष्ठांना एक नवा मित्र परिवार मिळाला आहे. आमच्यासाठी हे उद्यान जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे अशाच पद्धतीने पाहिल्यास उद्यानाची दुरवस्था दूर होईल. रात्रीच्या वेळी येथे काही समाजकंटकही येत असल्याचे कळते. त्यावरही आळा घालून उद्यानाचे पावित्र्य राखायला हवे.       

-पांडुरंग डोंगरे

आम्ही आमच्या नातवंडांना येथे खेळण्यासाठी घेऊन येतो. शहर वाढते आहे. अशा परिस्थितीत आमच्या घराशेजारी उद्यान असणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मुलांसह आम्हालाही चांगले वातावरण मिळत असल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. उद्यानात काही गोष्टी होणे आवश्यक आहे. मात्र तरीही उद्यान चांगल्या स्थितीत आहे.

-हरिश्चंद्र साळुंखे

उद्यान एक प्रकारे नवे मित्र जोडण्याची जागा वाटते. मित्रांच्या भेटीसाठी मी येथे येत असतो. नियमित उद्यानात येत असल्याने चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आहेत. उद्यानात पुरेशा सुविधा आहेत. मात्र तरीही त्याची आणखी काळजी घेण्याची गरज आहे. येथे अनेक प्रयोग झाले, मात्र त्यातील काहीच टिकले आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-दिलीप मोरे