ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात आंदोलन करणारे स्थानिक रहिवाशांसोबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अखेर बैठक आयोजित केली असून ही बैठक येत्या शनिवारी सकाळी मानपाडा भागातील एका वातानुकूलीत सभागृहात पार पडणार आहे. मात्र, ही बैठक लावण्यापुर्वी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेतलेले नसून या दिवशी अनेकांना काही कारणास्तव उपस्थित राहणे शक्य होणार नसल्यामुळे रहिवाशांमधून बैठकीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ठाणे -बोरीवली भुयारी मार्ग ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्पाचे सुरू झाले आहे. हा भुयारी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचे एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागात निघणार आहे. याच भागात निळकंठ वुडस, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, काॅसमाॅस लाउंज, सत्यशंकर अशी मोठी गृहसंकुले आहेत. याठिकाणी सुमारे १२ हजाराहून अधिक नागरिक राहत आहेत. भुयारी मार्गाच्या कामामुळे येथील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हरित पट्टा नष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर डम्परद्वारे होणाऱ्या वाहतूकीमुळे धुळ प्रदुषणात वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाचा पथकर नाका संकुलांच्या प्रवेशद्वारेजवळ उभारला जाणारा असल्यामुळे नागरिकांना संकुलातून ये-जा करणे शक्य होणार नाही. यामुळे स्थानिक रहिवाशांनी गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरून उत्स्फुर्तपणे आंदोलन केले होते.
भुयारी मार्ग रस्ते मार्गाऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. या आंदोलनानंतर ठाणे पोलिसांनी मध्यस्थी करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि स्थानिक नागरिकांची एक बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीच्या काही तास आधी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कामात व्यस्त असल्यामुळे ही बैठक रद्द केली होती. त्यानंतर आता एमएमआरडीने येत्या शनिवारी बैठक आयोजित केली आहे. मात्र, ही बैठक लावण्यापुर्वी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेतलेले नसून अचानकपणे ही बैठक लावली आहे. या दिवशी अनेकांना काही कारणास्तव बैठकीला उपस्थित राहणे शक्य होणार नसल्यामुळे रहिवाशांमधून बैठकीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
कुठे आहे बैठक?
मानपाडा येथील कोठारी कंपाऊंडमधील अनंता बँक्वेट हाॅल येथे शनिवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत बैठक आयोजित करण्यात आली असून यासंबंधीचे पत्र एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता शे. र. भदाणे यांनी काढले आहे.