ठाणे : जुन्या ठाण्यात पूनर्विकास प्रकल्प हाती घेऊन मे. जोशी एंटरप्रायजेसच्या कौस्तुभ कळके आणि त्याच्या साथिदारांनी शेकडो नागरिकांची फसवणूक केली आहे. बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके याच्याविरोधात गुन्हे दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे. असे असले तरी रखडलेला प्रकल्प कसा पूर्ण होईल असा प्रश्न फसवणूक झालेल्या रहिवाशांना निर्माण झाला आहे. रविवारी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कायदेतज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कौस्तुभ कळके आणि त्याच्या भागीदारांनी मे. जोशी एंटरप्रायजेस या नावाने बांधकाम कंपनी सुरू केली होती. जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा, चरई आणि पाचपाखाडी भागात अनेक इमारती जुन्या तसेच मोडकळीस आल्या होत्या. या इमारतींच्या पूनर्विकासाची कामे मे. जोशी एंटरप्रायजेस या कंपनीने हाती घेतली होती. परंतु भागीदारीमध्ये वाद निर्माण होऊ लागले. त्यानंतर पूनर्विकास प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जे मासिक भाडे ठरवून देण्यात आले होते. ते मासिक भाडे देखील मिळत नव्हते. कळके आणि त्याच्या भागीदारांनी पूनर्बांधणीतून तयार होणाऱ्या सदनिका देखील परस्पर विक्री केल्या होत्या. याप्रकारानंतर पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक झालेल्या नागरिकांनी कळके विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणांचा तपास ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.
हेही वाचा – ठाणे : जड-अवजड वाहनांमुळे घोडबंदर मार्गावर कोंडी, एक किलोमीटर अंतर गाठण्यासाठी दोन तास
कळके आणि त्याच्या साथिदारांनी प्रकल्प पूर्ण केले नाहीत. त्यामुळे प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. काही प्रकल्प तीन वर्षाहून अधिक काळापासून रखडलेले आहेत. अनेक कुटुंबियांनी साठविलेल्या पुंजीमधून घरे घेतली होती. परंतु फसवणूक झाल्याने ही कुटुंबे देखील घरांपासून वंचित आहेत. रविवारी नौपाडा येथील सहयोग मंदिर सभागृहात आमदार संजय केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबियांची बैठक घेतली. या बैठकीत १६ गृहसंकुलातील सुमारे २०० सभासद उपस्थित होते. सभासदांना कायदेतज्ज्ञांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.
पूनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरु असतील त्यावर टाच आणली पाहिजे. या फसवणूक झालेल्या कुटुंबांना सोबत घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता प्रयत्न करणार आहे. – संजय केळकर, आमदार.