लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे या गृह जिल्ह्यात स्वपक्षासह महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यात नाराज पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ऐरोलीचा अपवाद वगळता ठाणे शहर, बेलापूर, अंबरनाथ, कल्याण पुर्व, मुरबाड या मतदार संघातील नाराजांना खडेबोल सुनावत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला तर, लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीटाला मुकावे लागेल, अशी तंबी दिली.

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहे. यामध्ये यामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुुर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पुर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदार संघांचा समावेश आहे. या १८ विधानसभा मतदारसंघात एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाणे जिल्हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेतील बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील सर्वच शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असून या निवडणुकीत युती आणि आघाडीत बंडखोरी झाली आहे. या बंडखोरीमुळे ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अटी-तटीचा सामना झाला आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत गावठी मद्य विक्रेत्यांवर पोलिसांच्या धाडी

ऐरोलीचा अपवाद वगळता ठाणे शहर, बेलापूर, अंबरनाथ, कल्याण पुर्व आणि मुरबाड मतदार संघात बंडखोरामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली. असे असतानाच काही पदाधिकारी छुपा पद्धतीने तर काहीजण उघडपणे विरोधकांचा प्रचार करत असल्याचे समोर आले होते. बंडखोर आणि पक्षातील नाराजांच्या विरोधी प्रचारामुळे निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांपासून स्वपक्षीयांसह महायुतीतील नाराजांची कानउघाडणी करत त्यांना उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे.

मुरबाडमधील भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात शिवसेनेतील महत्त्वाचे काही पदाधिकारी प्रचार करीत असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोमवारी बदलापूरमधील मेळाव्यात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा आणि राज्याचा विचार करून महायुतीचा उमेदवार जिंकवा असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यापाठोपाठ ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी रात्री भाजप कार्यालयात बैठक घेतली. काही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा असून या नाराजांना मुख्यमंत्री शिंदे यांनी खडेबोल सुनावले.

आणखी वाचा-डोंबिवलीत सागाव येथे डॉक्टरला चार जणांची मारहाण

एक एक जागा महत्वाची आहे. महायुतीतील पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी सोबत काम करा, अशा सूचना केली. ज्या प्रभागात आपल्या उमेदवाराला कमी मते मिळतील, त्या प्रभागातील नगरसेवकाचे पालिका निवडणुकीचे तिकीट कापले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर बेलापूरमध्ये महायुतीतील काही नाराज पदाधिकारी भाजपचे उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात प्रचार करीत असल्याची चर्चा असून या पार्श्वभूमीवर त्यांनी टेंभीनाका येथे बेलापूरमधील पक्षातील नाराजांना बोलावून तंबी दिली. मते कमी पडली तर, पालिका निवडणुक तिकीटाला मुकावे लागेल असा इशारा दिला. कल्याण पुर्वेतही त्यांनी असाच संदेश दिला आहे. असे असले तरी ऐरोली मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे भाजपचे उमदेवार गणेश नाईक यांची डोकेदुखी वाढली आहे. शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी चौगुले यांचा प्रचार करीत असल्याची चर्चा असली तरी येथील पदाधिकाऱ्यांची मात्र शिंदे यांनी बैठक घेतली नसल्यामुळे वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत.