कळवा स्थानक ते ठाणे स्थानकापर्यंत प्रवाशांची पायपीट
ठाणे : पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे ठाणे आणि त्यापल्ल्याच्या शहरातील रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. उपनगरीय रेल्वेच्या काही फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच उपनगरीय रेल्वेची वाहतूकही सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्यामुळे कार्यालयात पोहचण्यासाठी उशीर झाला. कळवा स्थानकात रेल्वेगाडीत प्रवेश करता येत नसल्याने काही प्रवाशांनी पायपीट करत ठाणे स्थानक गाठल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे ते दिवा या स्थानकादरम्यान रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे जलद उपनगरीय रेल्वे गाडय़ांची वाहतूक दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान धिम्या मार्गिकेवरून सोडण्यात येत होती. काही रेल्वेगाडय़ांच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. याचा फटका शनिवार सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड झाली होती.
कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली होती. कळवा स्थानकात रेल्वेगाडीत चढता येत नसल्याने काही प्रवाशांनी पायपीट करत ठाणे स्थानक गाठल्याचे चित्र दिसून आले. तर मुंब्रा आणि दिवा येथील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने प्रत्येक १० ते १५ मिनीटांनी बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. परंतु या बसगाडय़ांतून प्रवास करताना अधिकचा वेळ जात असल्याने प्रवाशांचा या बसगाडय़ांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. डोंबिवली रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी असल्याचे चित्र होते.
आजपासून जलद मार्ग कार्यान्वित
यापूर्वी उपनगरीय जलद रेल्वेगाडय़ा पारसिक बोगद्यातून वाहतूक करत होत्या. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकनंतर कल्याणहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या जलद उपनगरीय गाडय़ांची वाहतूक कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या मार्गे सुरू होती. परंतु ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय गाडय़ांची वाहतूक ही पारसिक बोगद्यातूनच सुरू होती. पारसिक बोगद्यातून लांबपल्ल्याच्या गाडय़ा धावत असल्याने कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांची रखडपट्टी होत होती. अखेर शनिवारी २८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे रविवार सकाळपासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडय़ाही आता पारसिक बोगद्याऐवजी कळवा, मुंब्रा स्थानकांमधून वाहतूक करणार आहेत.