दळणवळणाच्या सोयींपासून वंचित असलेल्या मेळघाटामध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून ठाण्यातल्या आदिवासी भागामध्येही तीच परिस्थिती आहे. या सगळ्या भागांचा सामूहिक विचार करून विकासाचे सूत्र ठरवण्याची गरज आहे. रस्ते, वीज, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण या सगळ्याच गोष्टी एकत्र मिळणे गरजेचे आहे. तुकडय़ा तुकडय़ांचा विकास काहीच उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे सखोल आणि एकत्रित विकासाची गरज आहे, असे विचार मेळघाटमध्ये कार्यरत असलेल्या रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या वतीने आयोजित निर्धार परिषदेमध्ये कोल्हे दाम्पत्य यांना श्रीस्थानक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये होत असलेल्या निर्धार परिषदेमध्ये कोल्हे दाम्पत्याने उपस्थितांशी संवाद साधला. मेळघाटमध्ये तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात थोडा फारच बदल झालेला आहे. मात्र आजही या भागात सुधारणा झालेली नाही. शासनाच्या वतीने अन्न वितरित केले जाते. मात्र रस्त्यांची सुविधा नसल्याने ते अन्न त्या वंचित घटकापर्यंत पोहचतच नाही. दीडशेहून अधिक गावांमध्ये कुपोषण कायम आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज उभी करून या गावांचा विकास साधण्याची गरज आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असून मेळघाटमध्येही स्थलांतरितांचा प्रश्न मोठा आहे. प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने शहराकडे जाण्याचा आणि तेथे मजुरी करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळ्या भागाचा एकसंध विकास होण्याची गरज कोल्हे दाम्पत्यानी व्यक्त केली.
कार्यक्रमामध्ये डॉ. प्रभाकर देवधर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग उलगडून सांगितले. बालवयात मुलांवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे संस्कार होण्याची गरज आहे. त्यासाठी जिज्ञासा आणि निर्धार या दोन संस्था एकत्र येऊन आवश्यक उपक्रम राबवत आहेत. मुलांमध्ये वैज्ञानिक कुतूहल निर्माण करून त्यांना आवश्यक संसाधनांचा पुरवठा जिज्ञासा ज्ञान विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे.
कुपोषण रोखण्यासाठी मेळघाट पॅटर्न
कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाटामध्ये राबवण्यात आलेल्या प्रयोगाची दखल न्यायालयांपासून ते राज्य शासनाने घेतली. गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवरील उत्तरे शोधणारे मेळघाट पॅटर्न तयार झाले असून ते सर्वत्र राबवण्याची गरजही डॉ. रवींद्र कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.