भाईंदरमधील निश्चित जागेवर धार्मिक स्थळे, गोदामे, झोपडय़ा; महापालिकेसमोर मोठे आव्हान
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट परिसरात उभारले जाणार आहे, परंतु या स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेल्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात अति-क्रमणे असल्याने स्मारक उभारण्यापूर्वी ही अतिक्रमणे हटविणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे.
गोल्डन नेस्ट येथील आझादनगर येथील आरक्षण क्रमांक १२२ हे सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान यासाठी राखीव आहे. या आरक्षणावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारक उभारणीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव नुकताच महासभेपुढे आला होता. या वेळी या भूखंडावर तब्वल ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आसल्याची बाब समोर आली आहे. यात धार्मिक स्थळे, गोदामे तसेच झोपडय़ांचा समावेश आहे. त्यामुळे स्मारकाचा प्रस्ताव पुढे नेण्याआधी ही अतिक्रमणे हटविणे हे प्रशासनापुढचे मोठे आव्हान ठरणार आहे.
आरक्षणाचे एकंदर क्षेत्र ४६ हजार चौरस मीटर आहे, परंतु त्यापैकी केवळ ३० हजार चौरस मीटर क्षेत्रच महापालिकेच्या ताब्यात आले आहे. त्यातही एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे असताना हे स्मारक उभारणार कसे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी उपस्थित केला. दुसरीकडे हा भूखंड सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान यासाठी आरक्षित असून सामाजिक वनीकरणात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगीच नाही. प्रशासनाच्या ताब्यात आलेल्या या भूखंडाच्या क्षेत्रफळाच्या ५० टक्के जागा खेळाच्या मैदानासाठी आहे.
मैदानाचे आरक्षण असलेल्या भूखंडाच्या क्षेत्रफळाच्या केवळ १५ टक्के बांधकाम करता येत असते. त्यामुळे अतिक्रमणे सोडून उर्वरित जागेच्या १५ टक्के क्षेत्रात स्मारक उभारणे शक्यच नसल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला.
भूखंडावर अतिक्रमणे झाली आहेत. परंतु प्रस्तावाची कार्यवाही सुरू असेपर्यंत जागेवरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात येतील. त्यामुळे स्मारक उभारण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
– अच्युत हांगे, आयुक्त