आधुनिक युगात जग जवळ आलं असलं तरी माणसं एकमेकांपासून दूर गेली आहेत. आम्ही लहान होतो, तेव्हा आता ज्याला ‘लॅण्डलाइन’ म्हणतात तो साधा दूरध्वनीही अनेकांच्या घरी नव्हता. गावातील काही प्रतिष्ठितांचे दिवाणखाणे आणि सरकारी कार्यालयांमध्येच टेलिफोन नामक काळे डबे होते, पण आमचं काहीही बिघडलं नाही. नाही तर आताची पिढी, जरा काही कारणाने ‘ऑफलाइन’ असेल तर अगदी कासावीस होते. माफ करा हं, म्हणजेच सॉरी! तक्रार आणि तुलना करायची नाही, असं स्वत:ला बजावूनही मी अनेकदा दोन्ही करत असतो. स्वभावाला आणि वाढत्या वयाला औषध नाही, हेच खरं.
असो, तर मी काय म्हणत होतो? संपर्काची असली कोणतीही माध्यमं नसतानाही आम्हाला अख्ख्या आळीची खबरबात असायची. अगदी चरईत काही घडलं तरी लगेच चेंदणी कोळीवाडय़ापर्यंत खबर पोहोचायची. आता व्हॉटस्अपच्या जमान्यात सगळ्या जगाचे ‘अपडेटस्’ कळतात, पण जवळच्या माणसांची ख्याली-खुशाली काही समजत नाही. आता हेच पहा ना! नौपाडय़ातच अगदी हाकेच्या अंतरावर राहणारा आमचा बालमित्र बंडू बर्वे चार दिवस आजारी होता, पण हे आम्हाला परवा कळले. तेही आम्ही आचार्य अत्रे कट्टय़ावर गेलो म्हणून. कट्टय़ावर दर बुधवारी काही ना काही सुरू असतं. माहिती आणि रंजनाचा अखंड रतीब घालतात तिथे. आता ज्ञान मिळवून आम्हाला कुठे मर्दुमकी गाजवायची आहे म्हणा. पण त्यानिमित्तानं समवयस्क भेटतात, एकमेकांची विचारपूस करता येते. तरी नशीब आम्ही अद्याप जुन्या ठाण्यात आहोत. आता जुने ठाणे म्हणजे पूर्वीचे ठाणे, मूळचे ठाणे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अलीकडचे ठाणे. ब्राह्मण सोसायटी, विष्णूनगर, नौपाडा, पाचपाखाडी वगैरे. नवे ठाणे म्हणजे घोडबंदर रोड. पोखरण रोड. आमच्यातले काहीजण कुटुंब विस्तारल्याने आता या नव्या ठाण्यात जाऊन राहू लागले आहेत. त्यांचा तर काही थांगपत्ताच लागत नाही. गेल्या वषी अशोक कुलकर्णी अंदमानच्या सहलीत भेटला. म्हणजे पहा. एकाच शहरात राहत असूनही आम्ही दोन वर्षे एकमेकांना भेटलोही नव्हतो. सहलीत भेटल्यामुळे खूप गप्पा मारल्या. अशोक मुळात गमत्या. कोणतीही गोष्ट सांगताना हसवणं हा त्याचा स्वभाव. तो म्हणाला, ‘बाकी काही म्हणा, पण आमच्याकडे सहसा कुणी पाहुणे येत नाहीत. त्यातून कुणी अगत्याने एकदा आलेच, तर पुन्हा त्या वाटय़ाला जात नाहीत.’
‘ज्याची त्याला छान कोठडी,
कोठडीतले सखे सवंगडी,
हातकडी की अवजड बेडी,
प्रिय हो ज्याची त्याला’ ..
असं गदिमांनी म्हटलंय ना. अगदी तसं.
याचा अर्थ तिकडे फार गैरसोयी आहेत, असं अजिबात नाही. उलट असलाच तर सोयींचा अतिरेक आहे. औषधाचं दुकान कॉलनीतल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये. ‘गार्डन’ घराखाली. ग्रंथालयातील पुस्तकं घरपोच. त्यामुळे कोण कशाला घराबाहेर पडेल? पुन्हा घराबाहेर पडणं सोप्पे आणि स्वस्त का आहे?
आमच्यातील एका परिचिताने घोडबंदर रस्त्यावर नवे घर घेतले. बऱ्याच महिन्यापासून तो चहाला बोलवत होता म्हणून एकेदिवशी हिला (सौभाग्यवतींना) म्हटलं ‘चल जाऊन येऊ. जाऊन-येऊन रिक्षापोटी दीडशे रुपये लागले. त्यापेक्षा कमी पैशात माझा ठाणे ते बोरिबंदर रेल्वेचा महिन्याभराचा पास येत होता. तर कितीवर पडला तो चहा आम्हाला? आमची ही तर इतका पैसा खर्च झाल्याने पुढचे महिनाभर मला ऐकवून दाखवत हळहळ व्यक्त करीत होती.
अहो, घोडबंदर खूप लांब राहिले. आता बंडू बर्वेचे घर काय आमच्यापासून लांब आहे? पूर्वी बैठी चाळ होती, तेव्हा आमच्या घरातून हाक मारली तरी बंडूला ऐकू जाई. आता तो जमाना गेला. आता आम्ही अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर आणि बंडू टॉवरमध्ये सातव्या मजल्यावर. त्याला हॉस्पिटलमधून घरी आणल्याचे समजल्यावर भेटायला गेलो. मला पाहून त्याचा चेहरा खुलला. मनसोक्त गप्पा मारल्या. अनेक जुन्या आठवणी निघाल्या. आता असे नॉस्टेल्जिक होणं आवडत नाही अनेकांना, पण आमच्या पिढीला बरं वाटतं. त्यात रमावसं वाटतं. निघताना बंडू म्हणालाच, ‘अरे येत जा रे. औषधं काय फक्त जिवंत ठेवतील. तुमच्याशी बोलताना आपण खऱ्या अर्थानं जगतोय असं वाटतं.’
तेव्हा ठरवून टाकलं, अगदी दररोज नाही, पण आठवडय़ातून एक-दोनदा बंडू बर्वेसोबत गप्पांचा फड जमवायचा. आठवणींचा आल्बम पुन:पुन्हा चाळायचा..
महादेव श्रीस्थानकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा