लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस उपलब्ध झालेल्या १५० कोटी रुपयांचा निधीतून गायमुख आणि नागलाबंदर येथे दोन खत प्रकल्प उभारले जाणार आहेत. मात्र, या दोन्ही प्रकल्पांचे एकत्रिकरण करून तीन एकराच्या जागेत सुमारे ३०० ते ४०० टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती करणारा एकच मोठा प्रकल्प उभारा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या चार महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला. त्यात खत निर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरिवडे मैदानाचा विकास, आनंद नगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची कामे आता सुरू झाली असून त्याची पाहाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी सकाळी केली. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस १५० कोटी रुपयांचा निधी उपबल्ध झाला आहे. त्यात, गायमुख येथे एकूण ९७ टन आणि नागला बंदर येथे ५० टन क्षमतेचा खत प्रकल्प तसेच, १.५ टन क्षमतेच्या खत निर्मितीच्या दोन मोबाईल व्हॅन यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर रेंज यांच्या मध्यभागी ही जागा असून प्रकल्पास वनखात्याची परवानगी मिळाली आहे. गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील सर्व जागेचा वापर करून सुमारे तीन एकर जागेवर या दोन्ही प्रकल्पांचे एकत्रीकरण करा आणि सुमारे ३०० ते ४०० टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती करणारा एकच मोठा प्रकल्प कार्यान्वित करावा, असे निर्देश सरनाईक यांनी या दौऱ्यावेळी दिले. शहराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्यानेच त्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री सरानाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून ३०० ते ४०० टनांपर्यंतच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागला बंदर येथे राज्य शासनाच्या १५० कोटींच्या निधीतून मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारक स्थळाची पाहणी सरनाईक यांनी यावेळी केली. तसेच, स्थानिक रहिवाशांसोबत संवाद साधला. या भागातील सर्व बाधित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन होईल, याची काळजी महापालिकेने घ्यावी. त्यांच्यासोबत बैठक घेऊन घरे, बोटींचे संवर्धन हे विषय मार्गी लावावेत. येथील स्थानिक हे एकप्रकारे कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. आनंद नगर येथे राज्य शासनाचा एक भूखंड म्हाडाच्या ताब्यात आहे. त्या जागेवर महापालिकेच्या उद्यानाचे आरक्षण आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या भूखंडावर असणाऱ्या स्वामी समर्थ यांच्या मठासाठी रस्त्यालगत नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. त्याची पाहणीही सरनाईक यांनी केली आणि मठाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ही जागा रिक्त करून तेथे उद्यानासाठी महापालिकेस सहकार्य करावे. उद्यानास स्वामी समर्थ यांचे नाव देण्यात येईल. तसेच, या उद्यान आणि परिसराचे व्यवस्थापन मठाच्या माध्यमातून करावे. उद्यान सगळ्यांसाठी खुले राहील आणि त्यावर कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
घोडबंदर रोड प्रभाग क्र. १ मधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरीता ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बोरीवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. बोरिवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ ८४९७४ चौरस मीटर असून त्यापैकी ६८१९ चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे. या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत. त्यात, बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदी सुविधा असतील. तर, मल्लखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट , व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे. तसेच, मैदानाचे पूर्णपणे सपाटीकरण करणे, संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे. या मैदानालगत असलेल्या तबेल्यांचे स्थलांतर करण्याबाबत सरनाईक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.