प्रस्तावित क्रीडासंकुलाच्या भाजपच्या मागणीला सेनेचा विरोध

शिळफाटामार्गे अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना मेट्रोने जोडणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करण्यापूर्वीच बदलापुरात मेट्रो कारशेडच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली होती. त्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात एकत्र आलेले आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना जागेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र मंचावरून खाली उतरताच मेट्रोसाठी क्रीडासंकुलाचा बळी देणार नसल्याचे म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे मेट्रो की क्रीडासंकुल हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

बदलापूपर्यंत मेट्रो रेल्वे धावणार अशी घोषणा काही वर्षांपूर्वी भाजपच्या तत्कालीन नगराध्यक्षांनी केली होती. त्यानंतर विद्यमान भाजपचे आमदार किसन कथोरे यांनीही या मेट्रोची मागणी कायम ठेवली. भिवंडी येथील एका कार्य मानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिळफाटामार्गे बदलापूर मेट्रोची घोषणा केली. त्याची व्यवहार्यता तपासण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे बदलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करण्यापूर्वीच कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मुख्यालयात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या कारशेडसाठी आवश्यक असलेल्या जागेवर विचार करण्यासाठी बैठक पार पडली होती. त्यात सत्ताधारी शिवसेनेच्या नगराध्यक्षा विजया राऊ त उपस्थित असल्या तरी शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवली होती. या सभेत बदलापूरच्या क्रीडासंकुलाची जागा मेट्रोच्या कारशेडसाठी मागण्यात आली होती. बदलापूर पूर्वेत क्रीडासंकुलासाठी ५५ एकर क्षेत्रफळाची जागा आरक्षित आहे. सत्ताधारी शिवसेनेसाठी क्रीडासंकुलाचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. नेमकी तीच जागा मेट्रोसाठी मागितल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून अशा स्वरूपाची कोणतीही मागणी झाली नसताना जागा द्यायची कुणाला, असा सवाल त्या वेळी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला होता.

जागा क्रीडासंकुलासाठीच

कथोरे आणि म्हात्रे ११० फुटी ध्वजस्तंभाच्या अनावरणासाठी एका मंचावर उपस्थित होते. त्या वेळी कथोरे यांनी वामन म्हात्रे यांनी मेट्रो कारशेडसाठी सकारात्मक निर्णय घेऊ न सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी मंचावर म्हात्रे यांनी स्मितहास्य करीत प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र मंचावरून उतरताच बोलताना मेट्रोसाठी क्रीडासंकुलाचा बळी दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. शहरातील विविध भागांत मेट्रो कारशेडसाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे. क्रीडासंकुलाची जागा खूप मोठी असून ती त्याच कामासाठी राहील. इतर जागा पालिकेच्या वतीने दिल्या जातील असे म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

 

Story img Loader