भगवान मंडलिक, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण – कल्याण-तळोजा या १२ क्रमांकाच्या मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रस्तावित मेट्रो १२ रस्ते प्रकल्पाची पाहणी करत असताना ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना कल्याण डोंबिवली पालिकेने आपली ‘ना हरकत विकासकांकडून न घेता परस्पर इमारत बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. ही सर्व चारही गृहप्रकल्पांची बांधकामे तातडीने थांबविण्याच्या सूचना“एमएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विकासकांना दिल्या आहेत.

‘एमएमआरडीए’ने थेट हस्तक्षेप करून ही बांधकामे थांबविल्यामुळे कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मेट्रो मार्गाचे कल्याण शहर परिसरातील नियोजन ठरले असताना आणि तो आराखडा पालिकेच्या नगररचना विभागाकडे असताना नगररचना विभागातील ज्या अधिकाऱ्यांनी ‘एमएमआरडीए’चा विकासकांकडील ना हरकत दाखला न बघता, या कागदपत्रांची छाननी न करता परस्पर बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार मनोज कुलकर्णी यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात कार्यक्रमांद्वारे रामाचा जप; शिवसेना, भाजप आणि संस्थांकडून कार्यक्रमांचे आयोजन

कल्याण मधील मेट्रो मार्ग दुर्गाडी किल्ला, सहजानंद चौक, शिवाजी चौक, कल्याण रेल्वे स्थानक, वलीपीर रस्ता ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, पत्रीपूल पर्यंत प्रस्तावित आहे. बाजार समिती-पत्रीपूल येथून मेट्रोचा पुढील टप्पा तळोजापर्यंत प्रस्तावित आहे. हा मार्ग शिळफाटा, सोनारपाडा, मानपाडा, काटई, कोळे, हेदुटणे मार्गे तळोजाकडे जाणार आहे.

ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गानंतर कल्याण-तळोजा मार्ग तातडीने हाती घेतला जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाची पाहणी केली. त्यांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने मेट्रो मार्गाच्या प्रभाव क्षेत्रात इमारत बांधकाम परवानी देताना एमएमआरडीएची ना हरकत परवानगी सक्तीची केली आहे हे माहिती असताना परवानगी दिली असल्याचे लक्षात आले. २०१९ मध्ये मेट्रो मार्गावर बांधकाम परवानगी देतानाच्या अटीशर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.

विकासक नोटिसा

एमएमआरडीएच्या वरिष्ठ नियोजनकार उत्तमा फूलझेले यांनी कल्याण परिसरात मेट्रो मार्गात इमारत बांधकामे करणाऱ्या एल. ए. होम्स, भूमि बिल्डटेक, एस. एस. लाईफ स्पेस, एस. बी. टॉवर या विकासकांच्या बांधकाम प्रकल्पांना तातडीेने कामे थांबविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. संबंधितांनी एमएमआरडीएकडे ना हरकत दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तीन वर्षापूर्वी प्राधिकरणाने मेट्रो मार्गातील कल्याण मधील अनेक बांधकामे रोखली होती.

आणखी वाचा-डोंबिवलीतील भाजप नेते विकास म्हात्रेंचा राजीनामा, विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची खंत

या नियमबाह्य परवानग्यांना जबाबदार धरून साहाय्यक संचालक दीशा सावंत, नगररचनाकार सचिन घुटे, अभियंता देवीदास जाधव यांना निलंबित करण्याची मागणी कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली आहे. नियमानुसार परवानग्या दिल्या आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो मार्गाची कल्याण परिसरातील सीमारेषा जुनी आहे. एमएमआरडीएने नवीन मार्गिकेप्रमाणे सीमारेषा दाखविलेली नाही. त्यामळे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. नवीन मार्गिकेत परवानग्या दिल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे असेल तर चर्चेतून हा विषय सोडविला जाईल. -दीशा सावंत, साहाय्यक संचालक, नगररचना, कडोंमपा.

कल्याण मधील मेट्रो प्रभाव क्षेत्रातील बांधकामे तात्कळ थांबविण्याचे, एनओसीसाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. -उत्तमा फूलझेले, वरिष्ठ नियोजनकार, एमएमआरडीए.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro line construction stopped in kalyan mrj
Show comments